काँग्रेसमध्ये उमेदवारीबाबत गोंधळ
जत,(प्रतिनिधी)-
खासदार संजय पाटील यांच्या विरोधात उमेदवार उभे करण्याबाबत काँग्रेस गोंधळलेली असल्याचे स्पष्ट दिसत असून कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कालच झालेल्या काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत याचे पडसाद दिसून आले. या बैठकीत आमदार मोहनराव कदम आणि विश्वजीत कदम लोकसभेसाठी इच्छूक नसल्याचे स्पष्ट झाले.
भाजपाबद्दल असलेल्या नकारात्मकतेचा आणि नाराजीचा लाभ उठवून सांगली लोकसभा मतदारसंघात पुन्हा विजय मिळवायचा असेल तर उमेदवार बदला अशी आग्रही मागणीही या बैठकीत करण्यात आली. सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी गत पंचवार्षिक निवडणुकीत मोदी लाटेत त्याचा सुपडासाफ झाला. ऐनवेळी भाजपात गेलेले संजय पाटील यांनी माजी मंत्री प्रतीक पाटील यांच्यावर मात केली. आता पुन्हा त्यांनाच उमेदवारी देऊ नका, असाच सूर या बैठकीत दिसून आला. तरीही इच्छूक उमेदवार म्हणून माजी मंत्री प्रतीक पाटील यांची शिफारस करण्यात आली आहे. त्याचबरोबर शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील यांच्या नावाची शिफारस पदाधिकाऱयांनी केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष आणि आमदार मोहनराव कदम, आ. विश्वजित कदम यांच्या नावाचीही काहींनी शिफारस केली गेली. परंतु दोघाही आमदारांनी आपण लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले. साहजिकच इच्छूकांची संख्या कमी झाली आहे.
या बैठकीस निरीक्षक प्रकाश सातपुते, सहनिरीक्षक संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पार्लमेंट्री बोर्डाचे पदाधिकारी आ. विश्वजित कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील, माजी आमदार ऍड. सदाशिव पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदींसह 45 सदस्य उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष कदम, निरीक्षक सातपुते, सहनिरीक्षक पाटील यांनी बोर्डाच्या एकेक सदस्यांचे स्वतंत्रपणे म्हणणे ऐकून घेतले.
सर्व सदस्यांबरोबर पार्लमेंटरी सदस्यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. बंद खोलीतील चर्चेबाबतही गुप्तता पाळण्यात आली. पण, अन्य सदस्यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार बदलण्याची मागणी केली. गत काँग्रेस खासदारांचा संपर्क मतदार संघात नाही. भाजपाबद्दल जनतेमध्ये नाराजी आहे. पण त्याचा लाभ उठवून सांगली लोकसभा पुन्हा जिंकायची असेल तर काँग्रेसचा उमेदवार बदलण्याची मागणी अनेक सदस्यांनी केली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नावासाठी अनेक सदस्यांनी आग्रह धरल्याचे सांगण्यात आले.
बोर्डाच्या सदस्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला चांगले वातावरण असल्याचे सांगत उमेदवारांची नावे सुचवली. दुपारपासून सायंकाळपर्यंत चाललेल्या बैठकीचा सूर पाहिल्यास माजी मंत्री पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या नावाची शिफारस केली गेली . काहींनी जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम, आ. विश्वजित कदम यांच्या नावाचा आग्रह धरला. मात्र त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. सायंकाळपर्यंत बोर्डाच्या 45 जणांची मते आजमावण्यात आली. आजच्या बैठकीचा अहवाल आठवडाभरात प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठवला जाईल. आणखी कोणी इच्छुक असतील तर त्यांची नावेही प्रदेशकडे पाठवली जातील असेही निरीक्षक सातपुते यांनी सांगितले. प्रदेश काँग्रेस कमिटीची 21 रोजी मुंबईत बैठक होणार आहे. त्या बैठकीनंतर काँग्रेसच्या आगामी निवडणुकी संदर्भात धोरणे स्पष्ट करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment