Thursday, January 17, 2019

सांगली जिल्ह्यातल्या जि. प. व महसुलाच्या जागा कधी निघणार?

तरुणांना लागले नोकर भरतीचे वेध
जत,(प्रतिनिधी)-
काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सध्या राज्य व केंद्र सरकारकडून विविध विभागातील रिक्‍त पदे भरण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळेच आजघडीला विविध विभागातील तब्बल 24 हजार 971 पदे भरण्यात येत आहेत. त्यासाठी जाहिरातीही प्रसिद्ध झाल्या आहेत. परंतु, कला शाखेतील पदवीधर बोटांवर मोजण्याइतपत पदांसाठीच पात्र ठरत आहेत. या भरतीमध्ये कला शाखेतील पदवीधरांसाठी जागाच  नसल्याने त्यांचा मात्र आता धीर सुटू लागला आहे. तसेच राज्यातील विविध विभागातील रिक्‍त जागांच्या जाहिराती प्रसिध्द होऊ लागल्या आहेत. सांगली  जिल्हा परिषद आणि महसूल विभागातील जागा कधी निघणार, असाही सवाल स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांमधून उपस्थित होत आहे.

     येत्या एप्रिल महिन्यामध्ये देशात लोकसभा निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी मार्च महिन्याच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यातच निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच मेगा भरती करण्याचा राज्य सरकारचा इरादा आहे. प्रशासनाकडून तशा हालचाही सुरू असून काही विभागाच्या जाहिरातीही प्रसिध्द झाल्या आहेत. परंतु, ही पदे मेगा भरतीमधील आहे की, अन्य याबाबत संभ्रम आहे.
     या आठवड्याभरात विविध आठ विभागातील 24  हजार 971 पदांच्या जागांसाठी जाहिराती प्रसिध्द झाल्या आहेत. यामध्ये रेल्वे विभागातील सर्वाधिक 14 हजार 579 पदांचा समावेश आहे. त्यानंतर परिवहन महामंडळ, वनरक्षक, लेखा व कोषागार संचालनालय, नवोदय विद्यालय, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, कर्मचारी राज्य विमा महामंडळ, आरोग्य विभाग आदी विभागातील जागांचा समावेश आहे.
     या जागांमध्ये कला शाखेतील पदवी घेतलेल्या उमेदवारांसाठी बोटावर मोजण्याइतपच जागा आहे. राज्य लोकसेवा आयोगामार्फत 496 पदांसाठी संयुक्‍त पूर्व परीक्षा होत आहे. याच परीक्षेतसाठी कला शाखेतील पदविधर पात्र होत आहेत. यामध्ये सर्वाधिक जागा या पोलीस उप निरिक्षकांच्या असल्याने येथेही कला शाखेतील पदवीधरांची निराशाच होत आहे. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये कला शाखेतील पदवीधरांची संख्या सर्वाधिक आहे. काही पदांसाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर पात्र आहे. परंतु, त्याचवेळी टंकलेखन, संबंधित पदाच्या कामाचा अनुभव, वयाची अट अशा इतर अटी आहेत. त्यामुळे पदवी असूनही इतर अटींची पूर्तता असंख्य पदवीधर करू शकत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना या पदांच्या परीक्षेपासून मुकावे लागत आहे.  राज्य लोकसेवा आयोगातील अनेक पदांसाठी कला शाखेतील पदवीधर पात्र ठरतात. परंतु,  राज्यसेवेच्या परीक्षा देणार्‍यांची संख्या वरचेवर वाढतच चालली आहे. त्यातही अभियांत्रिकी, विज्ञान शाखेतील विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडे वळत आहेत. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांचा पास होण्याचा टक्‍काही जास्त आहे.
या विभागातील निघाल्या जागा
रेल्वे विभागात 14, 579, परिवहन महामंडळ- 4416, मत्स्य विज्ञान विभाग- 79, वनविभाग - 900, लेखा व कोषागारे संचालनालय - 932, नवोदय विद्यालय - 1416, सार्वजनिक बांधकाम विभाग -405, बृहन्मुंबई महानगरपालिकेत दुय्यम अभियंता - 291, कर्मचारी राज्य विमा महामंडळ - 392, आरोग्य सेवा विभागात वैद्यकीय अधिकारी- 877, राज्य लोकसेवा आयोग - 496. 

No comments:

Post a Comment