Friday, January 25, 2019

आमदार जगताप यांची पक्षातून हक्कालपट्टी करा:तम्मनगौडा रवीपाटील

सांगली,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील भाजप नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. आमदार विलासराव जगताप आणि जिल्हा परिषद शिक्षण सभापती तम्मनगौडा रवीपाटील या दोघांमधील संघर्ष टोकाला पोहचला आहे. जिल्हा परिषद सभापती तम्मनगौडा रवीपाटील यांनी आमदार विलासराव जगताप निष्क्रिय असल्याचा आरोप केला आहे. शिवाय पक्षातून जगतापांची हक्कालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

श्री. पाटील यांनी सांगलीत पत्रकार बैठक घेतली. यावेळी त्यांनी खासदार संजयकाका पाटलांवर टीका केली. कालच जत तालुक्यातल्या जाडर बोबलाद या ठिकाणी एका कार्यक्रमात खासदार संजय पाटील यांनी तम्मनगौडा रवीपाटील यांच्यावर टीका केली होती. संजय पाटील यांना आमचा सवाल आहे, तुम्ही मला निवडून आणण्यासाठी एक सभा सुद्धा घेतली नाही, याचे भान राखावे आणि या तालुक्यातील मते लोकसभेला तुम्हाला लागणार आहेत, हे लक्षात ठेवावे असा इशारा खासदार संजय पाटील यांना दिला आहे.
जत तालुक्यातील ४२ गावांना कर्नाटक राज्यातून पाणी देण्याच्या प्रश्नावरून सांगलीच्या जतचे आमदार विलासराव जगताप आणि जिल्हा परिषद आरोग्य सभापती तम्मनगौडा रवीपाटील यांच्यात वाद उफाळून आला आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हयातील भाजपाच्या नेत्यांना घेऊन तम्मनगौडा रवीपाटील यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विदयासागर राव यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी कर्नाटक राज्यातील तुबची-बुबलेश्वर येथून जत तालुक्याला पाणी देण्याची मागणी केली होती. तर आपल्याला डावलून भेट घेतल्याच्या गैरसमजुतीतून आमदार विलासराव जगताप यांच्याकडून आपल्यावर खालच्या पातळीवरील टीका करण्याचे प्रकार सुरू असल्याचे आज सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले.
गेल्या पाच वर्षात भाजपचे आमदार विलासराव जगताप यांना तालुक्यात पक्षाची कोणतीच वाढ केली नाही. उलट आपल्याला पक्षाची गरज नसल्याचे वारंवार सांगतात. दुष्काळ जाहीर होऊन दीड महिना उलटला तरी आमदार असलेल्या जगतापांना तालुक्याच्या जनतेची कोणतीच विचारपूस केली नाही. इतकेच नव्हे तर पाच वर्षांमध्ये तालुक्यात फक्त नारळ फोडण्याचे उद्योग त्यांनी केला आहे, असा आरोप करत आमदार विलासराव निष्क्रिय आमदार असल्याची टीका यावेळी रवीपाटील यांनी केली.
आमदार विलासराव जगताप यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी यावेळी तमनगौडा पाटील यांनी केली. त्याच बरोबर त्यांच्या हकालपट्टीसाठी आपण प्रदेश अध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्षांकडे मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment