Saturday, January 12, 2019

नोकरीच्या आमिषाने तिघांना गंडा


जत तालुक्यातल्या तिघांना फसवले
जत,(प्रतिनिधी)-
शासनाच्या सेल्स टॅक्स विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने बनावट नेमणूक पत्र देऊन तीन सुशिक्षित बेरोजगार तरुणांची आठ लाख 98 हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून बादशहा मुजावर (रा. पांढरा बंगला,जत), अरुण वसंत देशमुख व त्याची पत्नी अश्विनी अरुण देशमुख (रा. दोघे कोल्हापूर) या तिघांविरोधात अब्दुलरहेमान शेखलाल शेख (वय 30,मूळ गाव जत, सध्या रा. अंधेरी,मुंबई) यांनी शनिवारी जत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. 4 ऑक्टोबर 2014 ते 31 डिसेंबर 2018 या दरम्यान वेळोवेळी त्यांनी संबंधिताकडून पैसे घेतले आहेत. या प्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आली नाही.

अब्दुल रहेमान शेख व फिरोज मुजावर हे नातेवाईक आहेत. फिरोज मुजावर व अरुण देशमुख आणि त्याची पत्नी अश्विनी यांनी संगनमताने खोटे नेमणूक पत्र तयार करून शासनाच्या सेल्स टॅक्स विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अब्दुल रहेमान शेख व अभिजीत कुलकर्णी (रा.जत) आणि समीर नदाफ (रा. जत) या तीन सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडून वेळोवेळी आठ लाख 98 हजार रुपये रोख स्वरुपात घेतले. पैसे दिल्यानंतर नोकरी मिळेल या आशेवर त्यांनी तीन वर्षे वाट पाहिली.परंतु त्यांना नोकरी मिळाली नाही.
यामुळे त्यांनी शनिवारी जत पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सचिन गडवे करत आहेत. दरम्यान, पैसे देऊनही नोकरी मिळत नसल्याने आपली फसगत झाली आहे,हे अब्दुल शेख, अभिजीत कुलकर्णी व समीर नदाफ यांच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी बादशहा मुजावर, अरुण देशमुख यांच्याकडे पैसे परत देण्याची मागणी केली. यानंतर त्यांनी एकत्रितपणे नऊ लाख रुपयांचा धनादेश दिला. हा धनादेश बँकेतून वटला नाही. खात्यावर पैसे नसल्यामुळे तो परत आला.

No comments:

Post a Comment