Tuesday, January 22, 2019

शाळा-कॉलेजांमध्ये स्नेहसंमेलनाची रेलचेल सुरू

जत,(प्रतिनिधी)-
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातल्या शाळा-कॉलेजांमध्ये स्नेहसंमेलन,सांस्कृतीक कार्यक्रम ,क्रीडा स्पर्धाची रेलचेल सुरू झाली आहे. या निमित्ताने पालक मेळावेदेखील होत आहेत.जतच्या ग्रामीण भागात विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळांमध्यदेखील स्नेहसंमेलनाची जोरदार तयारी सुरू आहे.

     शालेय जीवनात बालगोपाळांच्या आवडीच्या दोन गोष्टी म्हणजे वार्षिक क्रीडा सामने आणि वार्षिक स्नेहसंमेलन. या दोन्हीचा विद्यार्थी मनसोक्त आनंद लुटतात. बालवयातच विद्यार्थ्यां -मध्ये असणार्‍या सुप्त गुणांची ओळख यावेळीच होते. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमधील एखाद्या कलेतील नैपुण्य आणि त्याचा कल कोठे आहे, याची पारख या निमित्ताने शिक्षकांना आणि पालकांना करता येते. प्रत्येक विद्यार्थी अभ्यासात पुढे असतोच असे नाही. मात्र एखाद्या क्रीडा प्रकारात, एखाद्या कलेत अथवा अभिनयात किंवा संगीतात त्याला अभिरुची असू शकते व त्याच्या अंगी ते सुप्त गुण असू शकतात.
     शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धा आणि वार्षिक स्नेहसंमेलन या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगची कला दाखविण्याची संधी मिळत असते. शिक्षक आणि पालक यांनी अशा वेळी त्यांची योग्य पारख केल्यास त्यांचे भविष्य बदलू शकते व अंगच्या कलेमुळे त्यांचे उज्वल करिअर बनू शकते. अनेक महान खेळाडू अथवा अभिनेते आणि कलाकार यातून जन्म घेऊ शकतात. सहामाही परीक्षा आणि दिवाळी झाल्यानंतर आता विविध शाळांत वार्षिक क्रीडा सामन्यांना सुरवात झाली आहे, तर अनेक शाळांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाच्या रंगीत तालमी सुरू झाल्या आहेत. काही शाळांनी स्नेहसंमेलने उरकलीसुद्धा आहेत. वैयक्तिक डान्स, ग्रुप डान्स, रेकॉर्ड डान्स, लोकनृत्य, एकपात्री नाट्यप्रयोग, गाणी, मिमिक्री, वेशभूषा अशा अनेक प्रकारात भाग घेत असल्याचे दिसत आहे.
     सुमारे 15- 20 वर्षांपूर्वी वार्षिक स्नेहसंमेलन हा काही खर्चिक प्रकार नव्हता. त्यामुळे पालकांना त्याचा भार पडत नसे. मात्र आता मुलांच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन आहे आणि त्यात आपला पाल्य भाग घेणार आहे म्हटल्यावर पालकांच्या अंगावर काटाच उभा राहतो. कारण वार्षिक स्नेहसंमेलनात भाग म्हणजे सर्वसामान्य शाळेत किमान पाचशे ते हजार रुपयांना तर हाय-ङ्गाय इंग्रजी माध्यमाच्या शाळेत किमान दोन ते तीन हजारांना फटका, अशीच सध्या परिस्थिती आहे. तरीही आपल्या मुलांच्या हौसेखातर पालक आपल्या खिशाला कात्री लावून घेतात व आपल्या मुलांचा हट्ट पूर्ण करतात, असे दिसून येते. अशा परिस्थितीत सर्वसामान्य गरीब विद्यार्थी मात्र काही वेळा त्यांच्या अंगी गुण असूनही आर्थिक विषमतेमुळे बाजूला पडतात, ही वस्तुस्थिती आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी शाळांनी पुढाकार घेण्यास सुरवात केली आहे, ही समाधानाची बाब आहे. जवळपास एक महिना आता शाळांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाची धूम दिसून येणार आहे. व त्यानंतरच त्यांचा वार्षिक परीक्षेसाठी अभ्यास सुरू होण्याची चिन्हे आहेत.

1 comment: