जत,(प्रतिनिधी)-
कोंतेबोबलाद (ता. जत) येथे शुक्रवारी शहानूर खाजासाब मकानदार (वय 25) याचा याचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला होता. त्याचा अनैतिक संबंध ठेवण्याच्या कारणावरून खून झाला असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी एका संशयित महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.अनैतिक संबंधासाठी वारंवार त्रास देत असल्याने आपण शहानूरचा गळा आवळून खून केल्याचे संशयित महिलेने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
उमदी पोलिस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी : शहानूर याचे गावातच मध्यवस्तीत सायकल दुरुस्तीचे दुकान आहे. गुरुवारी रात्री तो ‘बाहेर जाऊन येतो’ असे सांगून घरातून निघून गेला होता. रात्री तो घरी परतला नाही, अशी तक्रार त्याच्या वडिलांनी पोलिसांत दिली. त्याचा घातपात झाल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, शुक्रवारी (दि. 18) गावातील संशयित महिलेच्या घरासमोर शहानूर याचा मृतदेह पहाटे ग्रामस्थांना आढळला. त्याची मोटारसायकल जिल्हा परिषद शाळेजवळ सापडली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. त्यासाठी संशयित महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
संशयित महिलेने शहानूर याचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. ‘शहानूर हा मला काही महिन्यांपासून शरीरसंबंध ठेवण्यासाठी त्रास देत होता. परंतु मी त्याला नकार दिला. गुरुवारी ( दि. 17) शहानूर हा घरी आला. त्याने पुन्हा त्रास देत व मारहाणही केली. त्यावेळी मी चिडून जाऊन शहानूरचा गळा दाबला. त्यात त्याचा मृत्यू झाला’, अशी कबुली तिने दिली अशी माहिती पोलिसांनी दिली. जतचे उपविभागीय अधिकारी अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाने उमदीचे पोलिस उपनिरीक्षक नामदेव दांडगे या प्रकऱणाचा तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment