जत,(प्रतिनिधी)-
अबकी बार, आरोग्य अधिकार! असा नारा देत राज्यातील सरकारी 'दवाखान्याकडे होणारे राज्य शासनाचे दुर्लक्ष केव्हा थांबणार? याचा जाब विचारण्यासाठी सर्वसामान्य जनता, आशा, गटप्रवर्तक, डॉक्टर, नर्सेस, 'फार्मासिस्ट, आरोग्य कर्मचारी, यांच्या न्याय हक्कासाठी २३ जानेवारी रोजी विराट धरणे आंदोलन करणार असल्याचे महाराष्ट्र आशा-गटप्रवर्तक युनियन जिल्हा अध्यक्षा कॉ. मिना कोळी यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
जवळपास ७३ प्रकारची कामे करूनही केवळ १७०० ते २५०० रुपयाच्या कामाचा मोबदला मिळत असल्याने किमान वेतन व कामाच्या मोबदल्यात चार पटीने वाढ आणि इतर सामाजिक सुरक्षा या प्रमुख मागण्यासाठी जवळपास १५ ते २० हजार आशा कार्यकर्त्या या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
आरोग्य क्षेत्रातील अनेक संघटना एका व्यासपीठावर आल्या असून त्यांनी “आरोग्य सेवा संरक्षण व हक्क आघाडी” ची स्थपना केली आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या रुग्णालयामध्ये रुग्णांना औषधे मिळण्यापासून ते तळागाळापर्यंत काम करणाऱ्या आशांना किमान वेतन व इतर सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे. महाराष्ट्रात सुमारे ६५ हजार हून अधिक आशा व सुमारे ४ हजार गटप्रवर्तक कार्यरत असून त्यांना अत्यल्प मोबदल्यावर काम करावे लागत आहे.
सरकारी दवाखाने सुधारा व जनतेला चांगली आरोग्य सेवा द्या, १५००० रिक्त पदे तातडीने भरा, आशा व गटप्रवर्तक तसेच डॉक्टर व सर्व आरोग्य कर्मचारी यांना न्याय द्या. कंत्राटी व मानधनावर असलेल्या कामगारांना नियमित करा, औषधाचा प्रचंड तुटवडा आहे तो संपवा यासह अन्य मागण्या या विराट धरणे आंदोलनात मांडल्या जाणार आहेत. तरी सर्व आशा गटप्रवर्तक यांनी या विराट धरणे आंदोलनात आपला सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन फेडरेशनकडून करण्यात आले.
No comments:
Post a Comment