जत,(प्रतिनिधी)-
उमदी येथे अज्ञात चोरट्यांनी
बुधवारी रात्री धुमाकूळ घातला. तेराहून अधिक ठिकाणी डल्ला मारला त्यामुळे उमदीत
भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी मंदिर व बंद घरांना
आपले टार्गेट केल्याचे दिसते. सुमारे सत्तर हजारापर्यंतचा मुद्देमाल
चोरट्यांनी लंपास केला. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी
मागणी सरपंच निवृत्ती शिंदे ,उपसरपंच रमेश शेळके यांनी केली आहे.
बुधवारी रात्री उमदी गावातील
मध्यवर्ती ठिकाणी असणारे श्री मोनेश्वर देवस्थानचे बंद कुलूप तोडून चोरट्यांनी
तेथील दानपेटी पळवली. त्या दानपेटीत सुमारे 50 हजाराची रक्कम असल्याचे तेथील मंदिर अध्यक्षांनी सांगितले. तसेच गावातील मध्यवर्ती ठिकाणी तेरा घरांची कुलूपे तोडून किरकोळ रक्कमा व घरातील
साहित्य असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
या चोरी सत्रामुळे उमदी
गावात भितीचे वातावरण पसरले आहे. उमदी येथील बुधवारी रात्री बापू भद्रगोंड,
सुधाकर पोतदार, शिवानंद पोतदार, चेतन औराद कर, बाळासाहेब चव्हाण, पंढरीनाथ पोतदार , रमाबाई कुंभार, मदगोंडा हम्मीर, मुत्यांना हु़न्नूर, गोपाळबाई संकपाळ, यांच्या मालकीची ही सर्व घरे फोडली.
उमदी येथील चोरीच्या ठिकाणी
सांगलीचे श्वानपथक गुरुवारी दाखल झाले, तसेच ठसे तपासणी पथकही उमदीत
दाखल झाले होते. या दोन्ही पथकाकडून चोरीच्या ठिकाणाची पाहणी
करण्यात आली आहे, यापुढे चोरांचा तपास कितपत होणार हा खरा प्रश्न सर्वांसमोर आहे. आजवर झालेल्या एकाही चोरीचा तपास अद्याप
झालेला नाही. या चोरी सत्रामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
उमदी पोलिसांचे गस्त पथक
नावालाच असून या गस्त पथकाचा फायदा उमदी गावाला होतच नाही, पोलिसांचे
गस्त पथक महामार्गावर रात्रीच्या वेळी अवैद्य वाहतूकदाराकडून चिरीमिरी गोळा करण्यात
व्यस्त असते. त्यामुळे चोरट्यांचे फावले आहे. चोरट्यांनी आपला डाव साधायला सुरुवात केल्याची चर्चा सुरू आहे.
No comments:
Post a Comment