Saturday, January 26, 2019

म्हैसाळ योजनेचे पाणी सोडा; अन्यथा निवडणूकीवर बहिष्कार

एकुंडी ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव.
जत,(प्रतिनिधी)-
कायम दुष्काळी असणाऱ्या जत तालुक्यातील एकुंडी गावाकडे लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून  येत्या लोकसभा निवडणूकी आधी एकुंडीला म्हैसाळ योजनेचे पाणी सोडावे अन्यथा म्हैसाळ योजनेचे पाणी येऊपर्यंत सर्व निवडणूकीवर बहिष्कार घालण्याचा एकुंडी येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते ठराव करण्यात आला.

एकुंडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा एकुंडीचे सरपंच तथा सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अनेक विषयावर प्रदीर्घ चर्चा होऊन अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने अनेक महत्त्वपूर्ण विषय मार्गी लावण्याचा संकल्प करण्यात आला.
 सरपंच श्री. पाटील यांनी  अत्यंत शिस्तबद्ध व संयमी पद्धतीने कामकाज हाताळल्याने प्रत्येक प्रश्नावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
ग्रामसभेत प्रामुख्याने वैयक्तिक लाभाच्या योजनेचे लाभार्थी निवडणे, वैयक्तिक शौचालय मंजूर करणे, पिण्याच्या पाण्यासाठी वाढीव टँकर मागणी करणे, चारा छावणी किंवा चारा डेपो मागणी करणे, पाणंद रस्ते मंजूर करणे, पर्यावरण संतुलित योजनेमध्ये गावाचा समावेश करणे, विकासकामांचा कृती आराखडा, व्यायाम शाळा प्रस्ताव पाठविणे अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविणेकामी निर्णय घेण्यात आले. सर्व माहिती ग्रामसेवक अनिल ओलेकर यांनी सांगितले.
या ग्रामसभेत सरपंच बसवराज पाटील, उपसरपंच सरोजनी कोरे, सोसायटी चेअरमन श्रीमंत गुड्डोडगी, व्हा.चेअरमन मलगोंडा हेळकर, माजी सरपंच बशेट्टी कोट्टलगी, बाबाण्णा नाईक, मलगोंडा नाईक, महादेव कोट्टलगी, हणमंत कांबळे यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मी एकटाच गावाचा सरपंच नसून, आपण सर्वच सरपंच आहोत, या भावनेतून गावाचा विकास करूया. गाव नक्कीच सुजलाम् सुफलाम् झाल्याशिवाय राहणार नाही.
- बसवराज पाटील, सरपंच ग्रामपंचायत एकुंडी.

No comments:

Post a Comment