Wednesday, January 9, 2019

उमदीत घराला आग; अडीच लाखाचे नुकसान


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील उमदी येथील दस्तगीर अण्णाप्पा जमादार यांच्या घराला आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य,धान्य,पिकांची औषधे आणि रोख 70 हजार रुपये असे सुमारे अडीच लाखाचे साहित्य जळून खाक झाले. यामुळे जमादार यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे.
उमदी येथे सुसलाद रस्त्यालगत दस्तगीर जमादार यांची वस्ती आहे. इथे त्यांचे गवताचे छप्पर आणि पत्र्याचे घर आहे. बुधवारी सकाळी अचानक घराला आग लागली. काही कळण्यापूर्वीच घराला लागलेल्या आगीने रौद्ररुप घेतले. यावेळी घरात केवळ एक महिन्याचे बाळ पहुडले होते. त्याच्या आईने जिवाची पर्वा न करता आगीत घुसून त्याला बाहेर काढले. या आगीत जमादार कुटुंबाचे सर्व साहित्य जळून खाक झाले. या आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.

आग लागल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धावाधाव सुरू केली. मात्र परिसरात पाण्याची व्यवस्था नव्हती. लोकांनी प्रयत्न करूपर्यंत जमादार यांच्या कुटुंबातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. यामुळे हे कुटुंब रस्त्यावर आले आहे. दरम्यान, उमदी जिल्हा परिषद गटातील सदस्य विक्रम सावंत यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य चन्नाप्पा होर्तीकर, निवृत्ती शिंदे, संजयकुमार तेली, सुरेश कल्लोळी, निसार मुल्ला यांनी घटनास्थळी भेट देऊन आर्थिक व संसारोपयोगी साहित्याची मदत केली. यावेळी गावातील लोकांनी एकत्र येऊन त्यांचे घर पूर्ण करून देण्याचा संकल्प केला. तलाठी श्री. बागेळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
राजकीय मंडळींनी अशी केली मदत
घराला आग लावून झालेल्या नुकसानीमुळे जमादार कुटुंब रस्त्यावर आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येऊन जमेल तेवढी आर्थिक मदत केली. शिवाय घर बांधून देण्याचा निर्णय घेतला. विक्रम सावंत यांनी संसारोपयोगी भांडी दिली. निवृत्ती शिंदे अकरा हजार रुपये, सुरेश कुल्लोळी यांनी पाच हजार रुपये, संजय तेली यांनी दहा पोती सिमेंट, चांद बोर्गी यांनी पाच हजार, वहाब मुल्ला यांनी पाच हजार रुपये मदत देऊ केली.

No comments:

Post a Comment