जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढतच असून पिण्याच्या पाण्याची टंचाईदेखील तीव्र होत चालली आहे. जत तालुक्यात 23 गावांसह शंभराहून अधिक वाड्या वस्त्यांना 10 टँकरद्वारा पाणीपुरवठा होत आहे. दरम्यान, टँकर चालकांद्वारा मंजूर खेपा केल्या जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. शिवाय सध्या जिल्हय़ातील 61 गावे आणि 380 वाडय़ावस्त्यांना 51 टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे.
पावसाळय़ामध्ये दुष्काळी जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ यासह जिल्हय़ातील अन्य काही तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला नसल्याने खरिप आणि रब्बी हंगाम वाया गेला. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची टंचाई देखील तीव्र होऊ लागली. जसे उन्हाची तीव्रता वाढले तसे पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. गेल्या दोन महिन्यापासून दुष्काळी तालुक्यातील काही गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात येत असून या गावे आणि टँकरेच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे.
डिसेंबरअखेर जिल्हय़ातील जत 10, कवठेमहांकाळ पाच, खानापूर तीन, आटपाडी 10 आणि तासगाव एक अशा 41 गावांमध्ये 29 टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात होता. यामध्ये जानेवारीपासून दुपटीने वाढ झाली आहे. सध्या जिल्हय़ातील 61 गावे आणि 380 वाडय़ावस्त्यांना 51 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये सर्वाधिक जत तालुक्यातील 23, आटपाडी 16, कवठेमहांकाळ 6, खानापूर 5 आणि तासगाव एक अशा 61 गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विहीर, कुपनलिकांच्या पाणीपातळी वेगाने खालावत आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये उन्हाचा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता असल्याने आणखी काही गावे आणि वाडय़ा-वस्त्यांना पाण्याची टंचाई भासणार असल्याने या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे. दुष्काळी तालुक्यातील जनतेला मे अखेरपर्यंत पाणी आणि चाऱयासाठी चांगलीच धावाधाव करावी लागणार असल्याने त्यांची चांगलीच कसोटी लागणार आहे.
टँकरने पाणी पुरवठा केला जात असलेल्या गावांची तालुकानिहाय अशी: जत तालुका- सोन्याळ, व्हसपेठ, लमाणतांडा, दरिबडची, कोत्येंव बोबलाद, तिकेंडी, आसंगी, माडग्याळ, जाडरबोबलाद, निगडीखुर्द, एकुंडी, करेवाडी, अचकनहळ्ळी, सालेकिरी, बसरगी, खोजनवाडी, सोनलगी, दरिकोणुर, खैराव, पांढरेवाडी, देवनाळ.
आटपाडी तालुका- आटपाडी, पुजारवाडी, आंबेवाडी, लेंगरेवाडी, बेंबेवाडी, दिघंची-राजेवाडी, उंबरगाव, कौठुळी, तडवळे, पिंपरीखुर्द, विभूतवाडी, मापटेमळा, माडगुळे, दिघंची, लिंगीवरे, विठठलापूर, राजेवाडी, निंबवडे, मुढेवाडी, पळसखेल, आवळाई, पिंपरीबुद्रुक, कुरूंदवाडी.
कवठेमहाकांळ तालुका-लोणारवाडी, जाखापूर, केरेवाडी, कुंडलापूर, वाघोली, घाटनांद्रे, चुडेखिंडी, अलकुड(एस), रांजणी. खानापूर तालुका- हिवरे, पळशी, ताडाचीवाडी, बेणापूर, करंजे. तासगाव तालुका- लोकरेवाडी, वडगाव.
दरम्यान, एका बाजुला दुष्काळाची दाहकता वाढत आहे. पाण्याची मागणी वाढतच असताना दुसऱया बाजूला टँकर चालकांकडून मंजूर खेपा टाकल्या जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. तशा तक्रारी टँकर सुरू असलेल्या गावांतून केल्या जात आहेत. आठ-आठ दिवस पाण्याचा टँकर येत नाही. या कालावधीत पाणी कोठून आणायाचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या 61 गावे आणि 380 वाडय़ावस्त्यांना 147 खेपा मंजूर आहेत. मात्र अनेक ठिकाणी याप्रमाणे खेपा टाकल्या जात नाहीत. कागदोपत्री खेपा टाकल्याचे दाखवून बिले काढण्याचा उदयोग सुरू असून संबंधित विभागाने याची चौकशी करण्याची मागणी ग्रामीण भागातून जनतेतून केली जात आहे.
No comments:
Post a Comment