Thursday, January 17, 2019

'जत’ला रोजगार देता का रोजगार?

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात रोजगाराच्या दृष्टीने आवश्यक ती साधनेच उपलब्ध नसल्याने जतची अवस्था बिकट झाली आहे. यापूर्वी इतिहासकालीन युगात जतच्या वैभवाचे,भरभराटीचे  विविध प्रकारे वर्णन केले जायचे. इथे सोन्याचा धूर निघत, असे बोलले जायचे. पण त्याच जतवर कुणी रोजगार देता का रोजगार? असे म्हणण्याची वेळ आली आहे.

उजाड माळरान,कुठे डोंगर दऱ्या अशा  परिसराने वेढलेल्या राजापूर तालुक्याची लोकसंख्या ही 2 लाखाहून अधिक  आहे.  रोजगार, नोकरीनिमित्‍त तालुक्याच्या बाहेर गेलेल्या स्थलांतरित झालेल्या कुटुंबाचे ,तरुणाईचे  प्रमाण याठिकाणी जास्त आहे. मागील कित्येक  वर्षांपासून जत येथे औद्योगिक वसाहतीची स्थापना करण्यात आली आहे, मात्र कंपन्यांसाठी कुठल्याच साधन सुविधा उपलब्ध नसल्याने मोठे उत्पादक इकडे फिरकलेच नाहीत. पाण्याचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे गेल्या पन्नास वर्षांपासून पाण्यावरून राजकारण चालले आहे. उत्पादक कंपन्यांसाठी आवश्यक ती व्यवस्था झाल्यास उद्योग येतील आणि मग रोजगार उपलब्ध होतील. मात्र यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा मोठा अभाव दिसून येतो. दूरदृष्टीचा  नेता जतकरांना  लाभला नाही. उद्योगधंदे विकसित व्हावीत, अशी व्यवस्थाच या परिसरात उभारण्यात आली नाही.पाणी,वीज,रस्ते,रेल्वे या मूलभूत गरजांचीच याठिकाणी व्यवस्था नाही.
जत शहरापासून रेल्वेमार्ग जाणे आवश्यक आहे. मिरज-जत-विजयपूर असा रेल्वेमार्ग झाल्यास जत तालुक्याची भरभराट झाल्याशिवाय राहत नाही. परंतु, छोट्या मोठ्या मानापानात अडकलेल्या राजकारण्यांना जत तालुक्याचा विकास कशात आहे, असा विचार कसा येणार असा प्रश्न आहे. निधी आणला टीचभर आणि दाखवायचा वीतभर, असे सध्या चालले आहे.
जत तालुक्यात बोकडाचे मटण चवीसाठी प्रसिद्ध आहे. माडग्याळी मेंढीसुद्धा तिच्या गुणांसाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यात खिलार जनावरांची पैदास आणि संगोपन केले जाते. द्राक्ष, डाळींब आणि बोर यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जत तालुक्याला ज्वारीचे आगार मानले जाते. येथील डोण क्षेत्रातील ज्वारीला मोठी मागणी आहे. पाच्छापूर परिसरातील गव्हालादेखील मागणी आहे, मात्र यांच्या उत्पादन वाढीसाठी कुठलेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. बोकड, माडग्याळी मेंढी, डाळींब, माडग्याळ बोर यांवर अधिक संशोधन होऊन त्याचे उत्पादन वाढवण्याची गरज आहे.यासाठी संशोधन केंद्रे उभारण्याची गरज आहे. एकमेकांचे पाय ओढणाऱ्या राजकारण्यांना असे विषय डोक्यात शिरतील का?
 दुष्काळ दुष्काळ म्हणून ऊर बडवून पाहिले,पण गेल्या पन्नास वर्षात निराशाच पदरात पडली आहे. पाणी ,वीज ,रस्ते या मूलभूत प्रश्नांसाठी मोठा संघर्ष, आंदोलने करावी लागली आहेत. आता कुठे यासाठी प्रयत्न होताना दिसत आहे. सुदैवाने पाच हाय वे जत तालुक्यातून जात आहेत, याचा लाभ उठवण्याची गरज आहे. राजकारण बाजूला ठेवून जतच्या विकासासाठी सर्व राजकीय पक्ष, नेते मंडळी एकत्र येण्याची गरज आहे. जत तालुक्यातील पूर्व भागातील 42 गावांना पाणी मिळण्यासाठी तुबची-बबलेश्वर या कर्नाटकातील योजनेचा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न होताना आणि श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सध्या जत तालुक्यात सुरू झाला आहे. राजकीय महत्त्वाकांक्षापोटी काही मंडळी स्वतंत्ररित्या मंत्रीमहोदयांना भेटण्याचा आणि त्याद्वारे प्रसिद्धी मिळवण्याचा उद्योग सुरू केला आहे. तेच जर सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केल्यास मोठी ताकद सरकारपुढे दिसून येईल आणि मागणीला जोर येईल. पण दुर्दैवाने असे होताना दिसत नाही.
साहजिकच जतच्या लोकांना पोटापाण्यासाठी ऊसतोड, वीट भट्टी, दगड खाण आदी कामांसाठी स्थलांतर करावे लागत आहे. यामुळे जत तालुक्यातल्या लोकांचा आर्थिक स्थैर्याचा प्रश्न अधांतरीच आहे. अस्थिर जीवनाला स्थैर्य मिळवून देण्याची जबाबदारी राजकीय मंडळींची आहे,पण हीच आपल्या महत्वाकांक्षी कोषातून बाहेर पडायला तयार नाहीत. मग तालुक्यात रोजगार निर्मिती कशी होणार,याला अद्याप उत्तर नाही.

1 comment: