जत,(प्रतिनिधी)-
भारत हा खंडप्राय देश असून विविधतेने नटलेला आहे. या विविधतेमध्ये एकता राखण्याचे सामर्थ्य हिंदी भाषेत आहे.ज्या प्रमाणे मराठी भाषेत मधुरता आहे त्याचप्रमाणे हिंदी भाषेतही गोडवा आहे. मराठी व हिंदी यांची देवनागरी ही एकच लिपी आहे. म्हणून सर्वांनी हिंदी भाषेचे अध्ययन करावे,असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.व्ही.एस.ढेकळे यांनी केले.
जत येथील राजे रामराव महाविद्यालय येथे ,'विश्व हिंदी दिवस' साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी श्री. ढवळे बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रा. एच.डी.टोंगारे होते. प्रारंभी प्रा. सतीशकुमार पडोळकर यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले.
कोणतेही साहित्य अवघड नाही फक्त त्याचे मनापासून अध्ययन केले पाहिजे. साहित्याचे आपण वाचन केले पाहिजे, कारण साहित्य हे आपल्यामध्ये उर्जा, चेतना निर्माण करून जगण्यासाठी चांगल्या संस्काराची शिदोरी देत असते असे सांगून प्राचार्य डॉ. ढेकळे पुढे म्हणाले कि, माणसाला माणूस बनवण्याचे काम साहित्य करीत असते. माणसाच्या मनाची मशागत करण्याचे काम साहित्यच करत असते. स
यावेळी बोलताना प्रा. एच.डी.टोंगारे म्हणाले कि, आज जगामध्ये दोन नंबरला हिंदी भाषा बोलली जाते. हिंदी बोलणाऱ्याची संख्या जगामध्ये वाढत आहे. अमेरीकेमध्ये कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकविली जाते.चीन, जर्मनी, जपान, इटली, श्रीलंका आदी देशात द्वितीय भाषा म्हणून महाविद्यालयामध्ये हिंदी भाषा शिकविली जाते. आज जपानमध्ये ८२५ महाविद्यालयामध्ये हिंदी भाषा शिकविली जाते असे सांगून प्रा. एच.डी.टोंगारे पुढे म्हाणाले कि, हिंदी भाषेत अनेक रोजगारांच्या संधी दिवसेंदिवस उपलब्ध होत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराचे संधी उपलब्ध आहेत. म्हणून विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचे अध्ययन करावे असे सांगून ते शेवटी म्हणाले कि, विध्यार्थ्यानी साहित्याचे वाचन केले पाहिजे. कारण साहित्य हे मानवाला नीतिमान बनवते.
प्रारंभी विश्वहिन्दी दिन निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व बक्षीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीशकुमार पडोळकर व शेवटचे आभारप्रदर्शन प्रा. कु.यु.डी.देशमुख यांनी मानले.
No comments:
Post a Comment