Wednesday, January 16, 2019

बेळोंडगी येथील ग्रामपंचायतीवर महिलांचा घागर मोर्चा

महिलांची पाण्यासाठी धावाधाव
जत,(प्रतिनिधी)-
बेळोंडगी ( ता.जत ) येथे  पिण्याच्या  पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. गावाला पाणी पुरवठा करणारी  योजना  कुचकामी ठरली आहे. त्यामुळे नागरीकांना तिव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे . टँकरची मागणी करुनही तो मिळाला नाही.  तहसिलदार सचिन पाटील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी बेळोंडगी गावात येणार असल्याचे समजताच गावातील  महिलांनी टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरू करावा, या  मागणीसाठी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढून, ठिय्या मारला व शासनाचा निषेध केला.

    माजी पंचायत समिती सदस्या नजमा मकानदार व  वनिता पाथरूट, कस्तुरी मनुर, सातव्वा बासरगांव, सुभद्रा सुतार, सावित्री कोळी यांच्यासह गावातील शंभराहून अधिक महिला ग्रामपंचायतीवर काढण्यात आलेल्या मोर्चात  सहभागी झाल्या होत्या.
     याबाबत अधिक माहिती अशी की , बेळोंडगी गावापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर साठवण तलाव आहे. त्यामध्ये  मृतसंचय पातळीच्याखाली  पाणीसाठा आहे. तलावाखालील विहिरीतून गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी पंचायत  समीती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून 79 लाख रुपये खर्चाची भारत निर्माण योजना सन 2008-09  मध्ये मंजूर करण्यात आली आहे. त्याचे काम आजपर्यंत पूर्ण झाले नाही ते अपूर्ण आहे. त्यामुळे ही  योजना गावासाठी कुचकामी ठरली आहे. सदरची  योजना अद्याप ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आली नाही. याला ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सर्वस्वी जबाबदार आहे .त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.आसा आरोप ग्रामस्थामधून केला जात आहे.
     या अर्धवट योजनेतून  गावाला पाणी  मिळणे  शक्य नसताना प्रशासनाने गावात टँकर सुरू करण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.  प्रशासनाने  गावातील वस्तुस्थिती समजून घेतली नाही . त्यामुळे गावातील नागरिकांना तिव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अशी तक्रार मोर्चात सहभागी झालेल्या महीलानी तहसीलदार सचिन पाटील यांच्यासमोर केल्यानंतर टँकरचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे. सदरचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तात्काळ टँकर सुरू केला जाईल असे अश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर उपस्थित  महीलानी समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment