जत,( प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भष्टाचार करून ही योजना बंद पाडण्याचे पाप भाजपच्या बगलबच्चांनी केले आहे, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी पत्रकार बैठकीत केली.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, कार्याध्यक्ष नाना शिंदे, माजी सभापती बाबासाहेब कोडग, नगरपरिषदेचे बांधकाम सभापती भूपेंद्र कांबळे, नगरसेवक निलेश बामणे, सरपंच अण्णासाहेब गायकवाड बैठकीस उपस्थित होते.
काँग्रेस नेते म्हणाले, मनरेगा बंद पडल्यामुळे जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. जलसंधारण, जलयुक्त शिवार, रस्त्याच्या कामात टक्केवारी घेऊन तेच लोक काँग्रेसवर शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
नाना शिंदे म्हणाले, भाजपचे लोक नेत्याला खूश करण्यासाठी काँग्रेस नेते विक्रम सावंत यांच्यावर टीका करण्याचा उद्योग करीत आहेत. बिराजदार म्हणाले, भाजप पक्ष जनतेच्या मनातून उतरला आहे. जतसारख्या दुष्काळी भागास रोजगार हमी योजना वरदान होती. आम्ही बाजार समितीत अनेक विकासकामे करुन शेतकर्यांच्या हिताचा कारभार करीत आहोत. डाळिंब लिलाव सुरू केले. भाजपने जुन्या दुकानदारांच्या पोटावर पाय देऊन आपल्या बगलबच्चांना गाळे वाटप केले.
बाबासाहेब कोडग म्हणाले, काँग्रेस नेते प्रतीक पाटील आणि (स्व.) पतंगराव कदम यांनी म्हैसाळ योजनेचा केंद्रीय योजनेमध्ये समावेश केला. त्यामुळे पाणी आले आहे. भाजप फक्त वाढप्याचे काम करीत आहे. कदम यांनी टंचाई निधीमधून म्हैसाळ योजनेची वीज बिले भरली आणि मोफत पाणी दिले. पैसे भरूनही पाणी देत नाही. उलट शेतकर्यांवरच गुन्हे दाखल करीत आहे. भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांना पराभव समोर दिसत आहे.
No comments:
Post a Comment