Sunday, January 20, 2019

90 टक्के तरुण सोशल मीडियावर बिझी


भविष्यातील पिढीवर याचे विपरीत परिणाम; सच्चा मैत्रीची जाणीव व्हायला हवी
जत,(प्रतिनिधी)-
सोशल मीडियाचा वापर अलीकडच्या काळात चांगलाच वाढला आहे. सोशल मीडियाच्या व्यसनाची नशा अथवा धुंदी सोलापूरकरांमध्ये वाढत आहे. यामुळे माणसामाणसांमधील संवाद कमी झाला असून याबाबत विशेषतः युवा पिढीमध्ये जनजागृतीची गरज असल्याचे निरीक्षण शहरातील मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
स्मार्ट फोन आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे कौटुंबिक संवाद हरपतोय. रात्री उशिरापर्यंत विद्यार्थी मोबाइलमध्ये बिझी असतात. याचा प्रतिकूल परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे. त्यामुळे पालकांनीच पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या मोबाइल वापरावर निर्बंध घालावेत. अन्यथा भविष्यातील पिढीवर याचे विपरीत परिणाम होतील, असा इशारा मानसोपचार तज्ज्ञ
देत आहेत.

क्लिकवर सर्व माहिती मोबाइलच्या स्क्रिनवर येते. सोशल मीडियाचे असे फायदे असले तरी याचा वापर जपून होणे अपेक्षित आहे. आजकाल जवळपास 90 टक्के तरुण सोशल मीडियावर बिझी असतात. आपले मित्र किंवा मैत्रिणी क्षणोक्षणी काय करीत आहेत, कुठे आहेत किंवा कुणाबरोबर आहेत याची माहिती सोशल मीडियावर घेण्यासाठी तरुणाई उत्सुक असते. इतकेच नव्हे तर आपण काय काय करत आहोत याची खबरही ते सोशल मीडियावरून मित्रांना देत असतात. दैनंदिन जीवन जगत असताना अशा कृत्यांचे महत्त्व अगदी क्षणिक असते. मात्र अशा अर्थहिन गोष्टीत आपला बहुमोल वेळ घालविणार्या तरुणाईला त्यांच्या वेळेचे महत्त्वच कळालेले नाही. असेच म्हणावे लागेल. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण किंवा तरुणी आपापल्या फ्रेंडस्ची संख्या वाढविण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करतात. आपल्याला जितके अधिक कमेंटस् किंवा लाईक्स मिळाल्या तेवढ्या प्रमाणात आपली सामाजिक प्रतिमा उंचावते असा गैरसमज तरुण पिढीमध्ये निर्माण झाला आहे. स्वतःची सोशल स्टेटस् अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न होत आहे. वास्तविक सोशल मीडियावरचे मित्र किंवा मैत्रिणी आपल्या अवतीभवती असलेल्या खर्या आणि जवळच्या मित्रमैत्रीणींसारखे नसतात.
सोशल मीडियावर सर्वाधिक वेळ घालविणार्या किशोरवयीन मुलींमध्ये नैराश्य वाढत असून याचे प्रमाण याच वयातील मुलांच्या प्रमाणात दुप्पट असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. प्रत्येक कुटुंबातील चिमुकल्यांपासून मोठ्यांपर्यंत सोशल मीडिया हा त्यांच्या जीवनाचा अत्यावश्यक भाग बनला आहे. फेसबुक, व्हॉटस् अप, ट्विटर आणि इन्स्टाग्राम अशा विविधांगी अॅपमुळे प्रत्येकांची दिनचर्याच बदललेली आहे. या विविध अॅपद्वारे जगातील कुठल्याही टोकाला असलेल्या लोकांना आपण संदेश पाठवू शकतो किंवा त्यांचा संदेश काही सेकंदांमध्ये वाचू शकतो.
सोशल मीडियाचा वापर करणार्यांमध्ये गरीब-श्रीमंत या दोन्ही गटातील सर्वच वयोगटातील युजरकर्ते आहेत. सोशल मीडियाच्या या पिंजर्यात तरुणाई नक्कीच अडकली आहे. आता त्यातून सुटणे त्यांच्यासाठी फारच अवघड बनले आहे. वास्तविक सोशल मीडियाचा उगम सकारात्मकरितीने झालेला आहे. आपण रोजच्या व्यवहारात आपल्या कुटुंबाशी किंवा मित्रांशी कनेक्ट असतो. त्यामुळे एखाद्या संकटात आपल्याला अगदी वेळेत मदत मिळू शकते. सोशल मीडियामुळे ज्ञान आणि माहितीचे भांडार सर्वांसाठीच खुले झाले आहे.

सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असणारे कित्येक जण आपण पाहतो. या तरुणांच्या पोस्ट आणि फोटोंना हजारो लाईक्स मिळत असले तरी वास्तविकपणे निखळ मैत्रीपासून दुरावलेला हा वर्ग तणावग्रस्त होत चाललेला आहे. आपले दिसणे, असणे हे संपूर्णपणे या सोशल मीडियातील लाईक्सवर ठरविणारे तरुण नैराश्याच्या गर्तेत सापडत आहेत. या आभासी सोशल मीडियाची के्रझ जेव्हा सुरू झाली तेव्हा याकडे सर्वाधित आकर्षित झाले ते तरुण-तरुणी होय. आधुनिक तंत्रज्ञान म्हणून याकडे पटकन आकर्षित होणे नैसर्गिक होते. मात्र आज हाच सोशल मीडिया तरुणांना नैराश्याच्या खाईत ढकलत आहे. नेहमी चिडचिड होणे, छातीत धडधडणे, हातापायाला घाम येणे, प्रत्येक कामात आत्मविश्वासाचा अभाव अशा तक्रारी मानसोपचार तज्ज्ञाकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे. सतत ऑनलाइन असल्यामुळे प्रत्यक्ष सोनेरी नात्यामधील संवाद कमी होणे, इतरांशी तुलना केल्याने न्यूनगंड वाढणे आणि एकटेपणाच्या तक्रारीही वाढल्या आहेत. यामध्ये महिला आणि तरुणांचा जास्त सहभाग आहे.
 इतर दैनंदिन कारणांबरोबरच सोशल मीडियाच्या जास्तीत जास्त वापरामुळे हे नैराश्य येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सध्याच्या फोरजी युगामध्ये मोेबाइलच्या वापराचा मूळ उद्देश सर्वजण विसरून गेले आहेत. एकमेकांमध्ये संवाद साधणे, संपर्क साधणे यासाठी मोबाइलची निर्मिती करण्यात आली. याच गोष्टीचा सर्वांना विसर पडलेला आहे. सोशल मीडियाच्या अवास्तव वापरामुळे कुटुंबांमध्ये कित्येक वेळा वादाचे प्रकार उद्भवत आहेत.
आपण जसे आहोत तसा स्वीकार करण्यापेक्षा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा शरीर केंद्री होत आहे. सोशल मीडियावर मित्र-मैत्रिणींमध्ये सतत तुलना केल्यामुळे असमाधानी वृत्ती वाढत आहे. यातून मानसिक आजार वाढत आहेत. या सर्व गोेष्टींचा ताण वाढून नैराश्याची भावना अधिक प्रबळ होत आहे.
काल्पनिक असलेल्या सोशल मीडियावरची ही मैत्री क्षणभंगुरच असते. सच्चा मैत्रीची बातच काही और आहे. असे असले तरी सोशल मीडियावरील मैत्रीचे आकर्षण तरुणांना भुरळ पाडत आहे. हे आकर्षण म्हणजे एक प्रकारची नशाच आहे. या काल्पनिक जगाचा अनुभव आणि त्यात गुंतून राहाणे यामुळे ही तरुणाई वास्तविक जगापासून खूप लांब जात आहे. परिणामी त्यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. व्हॉटस् अप आणिफेसबुकमुळे लोकांच्या वेळेचा खेळखंडोबा होत आहे. परिणामी नागरिकांच्या झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. स्मार्ट फोनवरचे एसएमएस पाहाण्यातच त्यांचा वेळ जातो. मात्र याचे त्यांना भानच राहात नाही. परिणामी त्यांच्या दिनचर्याचे वेळापत्रक बिघडून कित्येक लोकांना निद्रानाशाचा विकार जडला आहे. सोशल मीडियाचा वापर किती करावा याबाबत बंधन येणे गरजेचे आहे.




No comments:

Post a Comment