Thursday, January 10, 2019

जत तालुक्यातील सरपंच 'बिडीओं'च्या पाठीशी

(सांगली जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देताना सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष बसवराज पाटील, शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी पाटील, राजाराम जावीर, विनोद कोडग आदी.)
ग्रामसेवकांवर कारवाई करा
   जत,(प्रतिनिधी)-     
 जत पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे व विस्तार अधिकारी मनोज जाधव यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करा असे निवेदन अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या जत तालुका पदाधिकाऱ्यांनी सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांना दिले आहे. 
 जत पंचायत समिती म्हणजे गेल्या दोन वर्षापासून घोटाळ्याचे माहेरघर बनले असताना जत पंचायत समितीला कधी नाही तेव्हा एक कर्तव्यदक्ष महिला गटविकास अधिकारी म्हणून अर्चना वाघमळे यांनी कार्यभार स्विकारल्यापासून कायदेशीर कामाचा धडाका लावून जत पंचायत समितीला एक ऊर्जितावस्था मिळवून देऊन  तालुक्यातील कामचुकारपणा करण्यासाठी निर्ढावलेल्या सर्व कर्मचारी व ग्रामपंचायत कडील ग्रामसेवक यांना सुरळीत व कायदेशीर काम करण्यास भाग पाडल्याने जत पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील कामांना गती व सुव्यवस्था आलेली असताना कायमस्वरूपी संघटना बांधून वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव आणणाऱ्या मुठभर ग्रामसेवकांनी पुन्हा कुरघोडी करण्यास सुरूवात केली आहे. अशा कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या विरोधात काही बदनाम झालेल्या ग्रामसेवकांनी बिनबुडाचे आरोप करून नाहक त्रास देऊन तालुक्यात होत असलेल्या चांगल्या विकास कामाला खो घालण्याचा प्रयत्न ग्रामसेवक करत आहेत. 
ज्या ग्रामपंचायतीमध्ये अशिक्षित व महिला सरपंच आहेत अशा ठिकाणी मुजोर ग्रामसेवक  सरपंचांना अंधारात ठेवून बेकायदेशीररित्या मनमानी कारभार करित आहेत. अशा ग्रामसेकांना आवरून जतच्या गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी सरपंचांना थेट मार्गदर्शन करून तालुक्यातील अनेक गावातील कामांना सुव्यवस्था निर्माण केलेली असताना काही मुजोर ग्रामसेवकांना मलई खायला वाव मिळत नसल्यामुळे ते ग्रामसेवक अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांवर बेभान व बिनबुडाचे आरोप करीत सुटले आहेत त्यांच्या या आरोपामध्ये काहीएक तथ्य नसून  मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मार्फत सदर ग्रामसेवकांची रितसर चौकशी करून त्यांचेवर योग्य ती कारवाई करावी. असे जत तालुका सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.  यावेळी सरपंच परिषदेचे जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब कोडग, जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील, संपर्क प्रमुख सुरेश कटरे, सहसंपर्क प्रमुख दिपक लंगोटे, संघटक राजाराम जावीर, आसंगीचे सरपंच श्रीमंत पाटील, सहसचिव किशोर बामणे, विनोद कोडग यांच्या सह सरपंच परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment