Friday, January 11, 2019

मकरसंक्रांती यंदा 15 जानेवारीला

जत,(प्रतिनिधी)-
यंदा 14 जानेवारी रोजी सोमवारी सायंकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होत असल्याने मकर संक्रमणानिमित्त केले जाणारे सर्व धार्मिक विधी 15 जानेवारी रोजी करावयाचे असल्याने पंचांगात मकरसंक्रांतीचा दिवस 15 जानेवारी असा दिलेला आहे.

मकरसंक्रांतीच्या दिवशी तिळाचे विशेष महत्त्व सांगितलेले असल्याने आंघोळीच्या पाण्यात तीळ घालून त्या पाण्याने आंघोळ करणे, तिळाचे उटणे अंगास लावणे, तीळ खाणे, तीळ दान करणे अशा वेगवेगळ्या प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो, असे मानले जाते. मकरसंक्रांतीविषयी दरवर्षी काही ना काही अफवा पसरवून लोकांमध्ये विनाकारण भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. तरी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता मकरसंक्रांतीचा सण सर्वांनी उत्साहात साजरा करावा व आपापल्या परंपरेप्रमाणे वाण-वसा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मकरसंक्रांतीप्रमाणेच पौष महिन्याविषयी देखील लोकांच्या मनात खूप गैरसमज आहे. इतर सर्व महिन्यांप्रमाणेच पौष महिन्यातदेखील मंगलकार्य, नवीन वस्तूंची खरेदी, नवीन कामांचा शुभारंभ करता येतो. त्यामुळे पौष महिना अशुभ मानू नये. काही कारणाने मकरसंक्रांतीच्या दिवशी प्रतिवर्षीप्रमाणे वाण-वसा करणे शक्य झाले नाही तर पुढे रथसप्तमीपर्यंत कधीही मकरसंक्रमणानिमित्त केला जाणारा वाण-वसा, हळदी-कुंकू हे कार्यक्रम करता येतात.
संक्रांतीचे फळ
बव करणावर संक्रांत होत असल्याने उक्त असलेले वाहनादी प्रकार याप्रमाणे- वाहन सिंह असून उपवाहन हत्ती आहे. पांढरे वस्त्र परिधान केले आहे. हातात भुशृंडी शस्त्र घेतले आहे. कस्तुरीचा टिळा लावलेला आहे. वयाने बाल असून बसली आहे. वासाकरिता चाफ्याचे फूल घेतलेले आहे. अन्न भक्षण करीत आहे. देव जाती आहे. भूषणार्थ प्रवाळ रत्न धारण केले आहे. वारनाव व नाक्षत्रनाव ध्वांक्षी असून सामुदाय मुहूर्त 30 आहेत. दक्षिणेकडून उत्तरेस जात आहे व ईशान्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष-गवत तोडणे, गाई-म्हशीची धार काढणे व कामविषय सेवन ही कामे करू नयेत.

No comments:

Post a Comment