जत,(प्रतिनिधी)-
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने चालक व वाहक व इतर तांत्रिक या पदासाठी मेगा नोकरभरतीचे आयोजन महामंडळाच्या वतीने करण्यात आले होते. ही जाहिरात जानेवारी २०१९ च्या काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. मात्र यामध्ये सांगली जिल्ह्याचा समावेश नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत जत येथील विक्रम ढोणे यांनी लेखी तक्रार एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, परिवहनमंत्री दिवाकर रावते व राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की,एसटी महामंडळाने ४२४२ इतक्या जागेसाठी चालक, वाहक व इतर तांत्रिक पदे या पदाची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीप्रक्रियेत राज्यातील १५ जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील युवकांना संधी मिळणार होती.शिवाय या भरतीमध्ये १६ टक्के मराठा आरक्षण देण्याचे जाहीर केले होते.या पदासाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले. पण या अर्जामध्ये गंभीर दुष्काळ असणाऱ्या सांगली जिल्हातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर,तासगाव या तालुक्यातील युवकांना नोकर भरतीपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे या दुष्काळी भागातील बेरोजगार युवकावर अन्याय होणार आहे. त्यामुळे या चालक व वाहक भरतीप्रक्रियेत नव्याने सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी विक्रम ढोणे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष
सांगली जिल्ह्यात सर्वात जास्त भाजपचे 4 आमदार व खासदार असतानाही भाजप सरकारने दुष्काळी भागातील युवकांवर अन्याय केला आहे. दुष्काळी जत तालुक्यातील जनतेने सलग तीन वेळा भाजपचे उमेदवार निवडून दिले. आज गल्ली पासून दिल्ली पर्यंत सत्ता असताना दुष्काळी जतच्या युवकांवर सरकारने अन्याय केला आहे, असे युवक नेते विक्रम ढोणे म्हणाले.
No comments:
Post a Comment