देवी कात्यायनी दुर्गेचे हे आगळेवेगळे रूप ‘कात्यायनी’ या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते. या संबंधीची कथा अशी सांगण्यात येते. कात्य गोत्राच्या
कात्यायन महर्षींनी उग्र तपश्चर्या करून देवीला त्यांची कन्या
(मुलगी) व्हावी असा वर मागितला. देवी पार्वतीने कात्यायन ॠषींच्या घरी जन्म घेतला. तसेच
तिची प्रथम पूजा कात्यायन ॠषींनी केली म्हणून तिला ‘कात्यायनी’
म्हणतात. ही महापराक्रमी देवी आहे. तिला निर्माण करताना ब्रह्मा, विष्णू व महेश यांनी आपापल्या
तेजाचे अंश हिच्यात दिले. हिने अनेक राक्षसांचा संहार केला.
वर्णन - तिचे रूप अत्यंत तेज:पुंज आहे. ही देवी सिंहावर आरूढ असून, चार हात असलेली चतुर्भुज रूपातील देवी आहे. उजवा हात
अभयमुद्रेत आहे, तर मागील हात वरमुद्रेत आहे. डाव्या हातात तलवार आहे. मागील डाव्या हातात कमळ आहे.
नवग्रहांपैकी गुरू ग्रहावर देवी कात्यायनीचा अमल आहे. हिच्या उपासनेमुळे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे पुरुषार्थ प्राप्त होतात. कात्यायनी हे देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे रूप आहे. देवीच्या या रूपामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत, असे मानले जाते. कुमारिका चांगल्या वरप्राप्तीसाठी कात्यायनी
देवीची आराधना करतात.
देवी कालरात्री
कालरात्री म्हणजे पुन्हा
कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती. देवीचे सातवे रूप
‘कालरात्री’ या नावाने प्रसिद्ध आहे. सातव्या दिवशी या देवीची पूजा करतात. देवीचे हे उग्र
रूप आहे. शुंभ-निशुंभ या राक्षसांचा निःपात
करण्यासाठी आपल्या सोज्वळ रूपाचा त्याग करून हे भयंकर रूप धारण केले. वर्णन- या देवीचा रंग काळा आहे. डोक्यावरील केस विस्कटलेले आहेत. गळ्यात विजेप्रमाणे
चमकणारी माळ आहे. तीन डोळे आहेत. तिच्या
श्वासाश्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला
निघतात. गाढव हे तिचे वाहन आहे. ती चतुर्भुज
आहे. तिचे हे अतिभयानक रूप असले तरी ही दुर्गा शुभफळ देणारी आहे
म्हणून तिला ‘शुभंकरी’ असेही म्हणतात.
हिच्या उपासनेमुळे साधकाच्या सर्व विघ्नांचा, पापांचा
नाश होतो. या देवीच्या स्मरणाने दैत्य, भूत, प्रेत, पिशाच्च आदी वाईट शक्ती
पळून जातात. उपासकाला अग्नी, जल,
जंतू, शत्रू यांपासून भीती राहात नाही.
देवीचे हे कृष्णवर्णीय रूप शनी ग्रहाशी संबंधित आहे.


No comments:
Post a Comment