नवरात्रीतील तिसर्या दिवशी ‘चंद्रघंटा’ या देवीची
पूजा करतात. तसेच 4 वर्षांच्या कुमारिकेचीही
पूजा करतात. या देवीच्या शरीराचा रंग सोन्यासारखा चकाकणारा असून,
तिला दहा हात आहेत. प्रत्येक हातात शस्त्रात्रे
आहेत. तिचे वाहन सिंह आहे.
भगवान शिवाशी विवाह झाल्यानंतर देवीने आपल्या मस्तकी
अर्धचंद्र धारण करण्यास सुरुवात केली. चंद्राचा आकार
घंटेसारखा असल्यामुळे तिला ‘चंद्रघंटा’ असे म्हणतात. या देवीच्या उपासनेने भक्तांना दिव्य गंध
जाणवतात. ऐश्वर्यप्राप्ती होते.
उपासक निर्भय व पराक्रमी होतो. दुर्गादेवीचे चौथे
रूप ‘कुष्मांडा’ या देवीची पूजा नवरात्रीच्या
चौथ्या दिवशी करतात. 5 वर्षांच्या कुमारिकेचीही पूजा करतात.
ही देवी सूर्याप्रमाणे कांतिमान आहे. सिंहिणीवर
आरूढ असून, अष्टभुजायुक्त आहे. सूर्याच्या
ऊर्जेचे आणि दिशेचे संचालन करणारे आदिशक्तीचे हे रूप आहे.
कुष्मांडा
देवीच्या उपासनेमुळे आरोग्य प्राप्त होते. आयुष्य, यश, बलवत्ता, कीर्ती, संपत्ती प्राप्त होते. थोड्याशा भक्तीनेही ही देवी प्रसन्न
होते. या देवीला सर्वांत जास्त कोहळा आवडत असल्यामुळे
‘कुष्मांडा’ हे नाव प्रसिद्ध झाले. नवरात्राच्या पाचव्या दिवशी ‘स्कंदमाता’ या देवीची पूजा करतात, तसेच 6 वर्षांच्या
कुमारिकेची पूजा करतात. स्कंदाच्या अर्थात कार्तिकेयाच्या जन्मानंतर
देवी पार्वती स्कंदमाता म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यामुळे या
देवीच्या मांडीवर बालरूपात कार्तिकस्वामी बसलेले आहेत. स्कंदमाता
ही सिंहावर आरूढ असलेली चतुर्भुजा देवी आहे. ही कमळासनी किंवा
पद्मासना या नावानेही ओळखली जाते. ती गौरवर्णी असल्याने शुभ्रा
आहे. या देवीच्या उपासनेने साधकाचे मन बाह्य चित्तवृत्ती उपाधीपासून
मुक्त होते. त्या व्यक्तीला परमशांती, सुख
लाभते. नवरात्रीच्या तृतीयेला ‘हिरवा’
या रंगाची वेशभूषा देवीला करतात. साखरभाताचा नैवेद्य
दाखवून दुधाचे दान आज करावे. याने दीर्घायुष्य लाभते.
प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत देवीची ओटी भरावी. शक्य असल्यास मंगळवार, शुक्रवार, पंचमी, अष्टमी व चतुर्दशीला भरावी. ओटी भरताना भरजरी साडी नेसून दागिने घालावे. नथ घालावी.
हातात काचेच्या हिरव्या बांगड्या घालाव्यात, पैंजण
घालावे. जेवणाच्या आधी ओटी भरावी. ओटीचे
साहित्य : 3 ते 4 मूठ तांदूळ किंवा गहू,
सुपारी, लेकूरवाळे हळकुंड, बदाम, खारीक, नारळ, विड्याची पाने 2 व साखरेची पुडी किंवा पेढे, बर्फी, लाडू न्यावे. वर्षातून एकदा
तरी आपल्या कुलस्वामिनीला आपल्या ऐपतीप्रमाणे जरीकाठापदाराची साडी व ब्लाऊजपीस द्यावा.
देवीला 11 रु. दक्षिणा ठेवावी.
हळदकुंकवाची पुडी, उदबत्ती, सुवासिक फुलांचा गजरा द्यावा. असे महत्त्व नवरात्रीच्या
तृतीयेचे आहे.

No comments:
Post a Comment