जत,(प्रतिनिधी)-
दसरा उत्सवकाळात कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी
बिरोबा बन आणि पंचक्रोशीत सामाजिक, राजकीय सभा, मेळाव्यांना प्रतिबंध करावा, अशी मागणी लेखी
निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी विजय काळम- पाटील यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते
विक्रम ढोणे यांनी केली आहे.
आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा देवस्थान शेकडो
वर्षापासून अस्तित्वात आहे आणि इथे दसरा उत्सवकाळात झाडपीडीची परंपरा आहे. झाडपीडी
देवाच्या सेवेसाठी केली जाते. दसऱ्यापुर्वी दहा दिवस उत्सव सुरु होतो आणि दसऱ्याला
संपतो. या काळात लाखो भक्तगण आरेवाडी बन आणि पंचक्रोशीत येतात. या भक्तांचा
राजकीय फायदा करुन घेण्यासाठी दोन वर्षांपुर्वी राजकीय मंडळींनी श्री बिरोबा
देवस्थान ट्रस्टला हाताशी धरुन बिरोबा बनात धनगर समाजाचा दसरा मेळावा घेतला.
देवस्थानच्या शेकडो वर्षांच्या इतिहासात दसरा मेळाव्याची कोणतीही परंपरा नसताना
ट्रस्टने सत्ताधारी लोकांच्या सोयीसाठी बेकायदेशीरपणे मेळावा घेतला. या मेळाव्याला
राज्य मंत्रीमंडळातील मंत्रीही उपस्थित होते. येथील सर्व भाषणे राजकीय हेतूने
प्रेरीत होती.
गेल्यावर्षीही उत्सवकाळात दसरा मेळावा
झाला. त्या मेळाव्यालाही राज्याचे मंत्री उपस्थित होते. महत्त्वाची बाब म्हणजे
त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना बिरोबा बनाचा
वापर राजकीय सभेसाठी झाला. सत्ताधारी लोकांच्या सहभागामुळे प्रशासनाने या
बेकादेशीर मेळाव्याकडे दुर्लक्ष केले. आता यंदा 16 ऑक्टोंबर
2018 रोजी तिसरा दसरा मेळावा बिरोबा बनात घेण्याचे घाटत आहे.
या मेळाव्यातून राज्याच्या राजकारणाची दिशा बदलवण्याच्या घोषणा काही लोक करत आहेत.
सत्ताधारी पक्षातील स्थानिक वादाचे उट्टे या मेळाव्यातून काढण्याचेही घाटत आहे.
तशा चर्चा वर्तमानपत्रे आणि सोशल मिडीयातून सुरु आहेत. तसेच धनगर समाजातील दोन गट
वेगवेगळे मेळावे पंचक्रोशीत घेणार असल्याचीही चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर बिरोबा
बनाचा भगवानगड होत असल्याची परिस्थिती दिसत आहे.
दोन वर्षापुर्वी दसरा मेळाव्यावरुन भगवानगड
(ता. पाथर्डी. जि. अहमदनगर) येथे झालेली दंगल महाराष्ट्राने पाहिली आहे. आरेवाडी
परिसरातील राजकीय मेळावे हे धनगर आरक्षण मुद्याभोवती केंद्रीत आहेत. आगामी
निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर इथे भडक भाषणे देवून वातावरण तापविण्याचा प्रयत्न
केला जाणार आहे. यातून भांडणतंटा होवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू
शकतो. अराजकसदृश्य परिस्थिती निर्माण होवून लोकांच्या जीवाचेही बरे-वाईट होऊ
शकते.
त्यामुळे बिरोबा बनाचा राजकीय अड्डा होवू नये आणि
धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून पावित्र्य कायम राहावे, यासाठी
जिल्हादंडाधिकारी म्हणून आपण हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे.
यापार्श्वभूमीवर बिरोबा भक्त या नात्याने प्रमुख दोन
मागण्या आहेत. आरेवाडी बिरोबा बनात आपल्या उद्दिष्टांच्या बाहेर जावून
बेकायदेशीरपणे दसरा मेळावा घेणाऱ्या श्री बिरोबा देवस्थान ट्रस्टला (रजि. नं. ए. 1273, स्थापना 31/3/1977) चौकशीची नोटीस द्यावी, तरीही ते मेळावा घेत असतील तर ट्रस्ट बरखास्त करुन प्रशासक नेमावा.
देवस्थान परिसरात येणाऱ्या रस्त्यालगत (एंट्री पॉइंट),
ढालगाव, नागज, आदी
गावांच्या आरेवाडी पंचक्रोशीतही कोणत्याही प्रकारच्या मेळाव्यांना परवानगी देण्यात
येवू नाही. प्रस्तावित मेळावे हे बिरोबाच्या भाविकांना राजकीय हेतूने प्रभावित
करण्यासाठी आहेत. त्यामुळे मेळावा कुठेही ठेवला तरी समर्थकांचे शक्तीप्रदर्शन
बिरोबा बनात केले जावू शकते, तसेच मेळावा घेणारे दोन गट अथवा
इतर वादांचे पर्यावसान या मेळाव्यांच्या ठिकाणी मारामारीत होवू शकतो. काही
पुढाऱ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता ते स्टंट करुन जातीय तणाव वाढवू शकतात.
त्यामुळे दसरा उत्सवकाळात, विशेषत: 16 ऑक्टोंबर रोजी आरेवाडी परिसर आणि कवठेमहांकाळ तालुक्यात
कोणत्याही सामाजिक, राजकीय मेळाव्यांना परवानगी देवू नये अशी
मागणी सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केली आहे.

No comments:
Post a Comment