ग्रामीण भागातील व्यवहारावर परिणाम
जत,(प्रतिनिधी)-
ऑक्टोबर हिटने जीव वैतागला असतानाच, आता त्यात भारनियमनची भर पडली आहे. ग्रामीण भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून नऊ-नऊ तास वीज गुल होऊ लागल्याने लोकांचा जीव कासाविस होऊ लागला आहे. भारनियमनाचा मोठा परिणाम दैनंदिन व्यवहारावर होऊ लागला आहे.
आधीच पाऊस नसल्याने लोकांच्या हाताला
काम नाही. त्यात ऑक्टोबर हिटमुळे लोकांना घराबाहेर पडणे मुश्किल
झाले आहे. त्यात मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू झाल्याने ना घरात,
ना बाहेर लोकांचे मन रमेना झाले आहे. लोकांना काय
करावे, समजेना झाले आहे. या दोन्ही गोष्टींमुळे
लोकांच्या दैनंदिन व्यवहारावर परिणाम झाला असून बाहेरची कामे सकाळ-संध्याकाळ पूर्ण करण्याकडे कल वाढला आहे. शेतीची कामेदेखील
पहाटे लवकर उठून उरकली जाऊ लागली आहेत. दळप, झेरॉक्स, कपडे इस्त्री यावरदेखील भारनियमनाचा परिणाम
झाला आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा टँकरद्वारा
मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. आता त्यांच्या वेळा तर बदलल्या
आहेतच, शिवाय काहींना पाणीही मिळेना,त्यामुळे
लोकांचे हाल सुरू झाले आहेत.
जत तालुक्यात बहुतांश गावांमध्ये पिण्याच्या
पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. भारनियमनामुळे
विहिरी, बोअरवरच्या मोटरी बंद राहिल्याने लोकांना पाण्यासाठी
भटकंती करण्याची वेळ आली आहे. ऑक्टोबर हिटने आधीच वैतागलेल्या
लोकांना भारनियमनामुळे पाणीटंचाईसह अन्य गोष्टींच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

No comments:
Post a Comment