जत,(प्रतिनिधी)-
राजकारणात प्रत्येकाची एक महत्त्वाकांक्षा
असते. ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण धावत असतो. पण राजकारणात महत्त्वाकांक्षा बाळगणार्यांना खेळ्या-कुरघोड्या केल्याशिवाय काही पदरात पडत नाही. राजकारण
हा साध्या,प्रामाणिक माणसांचा प्रांत नाही, असे उगीच म्हटले जात नाही. त्यामुळे ही महत्त्वाकांक्षा
पूर्ण करण्यासाठी धडपड सातत्याने करावी लागत असते. आता सांगली
जिल्हा परिषदेचेच उदाहरण घ्या. विद्यमान पदाधिकार्यांना पदे बहाल करताना सव्वा वर्षांची मुदत देण्यात आली होती. कारण उरलेल्या बाकीच्या लोकांनाही पद भोगण्याची संधी मिळावी. पण गुळाला जशा मुंग्या चिकटून बसतात, तशी ही मंडळी सव्वा
वर्ष उलटून गेले तरी खुर्चीला चिकटून आहेत. साहजिकच खुर्चीची
महत्त्वाकांक्षा बाळगून असणार्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याशिवाय
कशी राहिल. अशा बारा सदस्यांनी पक्षश्रेष्ठींना पदाधिकारी बदला
नाही तर भूकंप घडवू, असा इशारा दिला आहे. अर्थात सांगली जिल्ह्याच्या भाजपच्या राजकारणात एकमेव असा नेता नसल्याने पदाधिकारी
बदलाचा चेंडू चक्क मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला आहे. त्यांनी
मात्र सर्वांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे.

पण यामुळे इच्छूक सदस्यांची अस्वस्थता
बळावली आहे. त्यांनी आपण स्वस्थ बसणार नसल्याचा
पुरुच्चार केला आहे. त्यामुळे या मंडळींचे नेतृत्व आता खासदार
संजयकाका पाटील यांनी स्वत:कडे घेतले आहे. खासदार पाटील यांना भाजपमध्ये जिल्ह्याच्या राजकारणात अद्याप महत्त्व दिले
जात नाही, ही त्यांची खंत आहे. त्यांना
जिल्ह्याचा नेता व्हायला साहजिकच काही लोकांचा खोडा आहे. त्यांना
सत्तेपासून दूर ठेवले की, आपला मार्ग सुकर झाला, असे संजयकाकांना वाटणे साहजिक आहे. त्यांच्या नेतृत्वात
अडथळा ठरू शकणारे मोहरे आहेत, जि.प.
अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष अमोल बाबर
आणि समाजकल्याण सभापती ब्रम्हदेव पडोळकर! या लोकांशी काही प्रमाणात
जुने वैरदेखील आहे. संग्रामसिंह यांचे बंधू पृथ्वीराज देशमुख
भाजपा जिल्हा अध्यक्ष आहेत. शिवाय वालचंद महाविद्यालयाच्या प्रश्नावरून दोघांमध्ये विस्तव जात नाही. खानापूर-
आटपाडी विधानसभेचे, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर
आणि संजयकाका पाटील यांच्यात
एका साखर कारखान्यावरून न्यायालयीन लढाई सुरू आहे. भाजपाचे युवा
नेते गोपीचंद पडोळकर यांचे भरारी घेण्याचे स्वप्न त्यांचे पंख कापून करण्याचा प्रयत्न
खासदार पाटील यांच्याशी केल्याच्या कारणावरून या दोघांमध्ये उभा दावा उभारला आहे.
अर्थात या सर्वांना खासदारांचे नेतृत्व मान्य असायचे काही कारणच नाही.
इकडे या लोकांना पदावरून बाजूला केल्यास
त्यांचे महत्त्व आपोआप कमी होईल, ही राजकीय खेळी
संजयकाका राबवत असल्याचे बोलले जात आहे. कारण अध्यक्षपदवरून संग्रामसिंह
देशमुख यांना दूर केल्यावर पृथ्वीराज देशमुख यांच्या आमदारकीच्या स्वप्नाला खीळ बसू
शकते. उपाध्यक्षपदावरून अमोल बाबरांना दूर सारल्यावर त्यांनाही
पुढच्या काळात फटका बसू शकतो. आणि समाजकल्याण सभापती ब्रम्हदेव
पडोळकर यांना पदावरून बाजूला केल्यावर भरारी मारणार्याचा प्रयत्न
करणार्या गोपीचंद पडोळकर यांचे पंख कापले जातील. त्यामुळे खासदार पाटील यांनी पदाधिकारी बदलामध्ये लक्ष घालण्याची विनंती मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. त्यामुळे आता सर्वस्वी निर्णय
मुख्यमंत्री घेणार आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लक्षात
ठेवून त्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. इकडे जतचे भाजपाचे आमदार
विलासराव जगताप यांनाही पदाधिकारी बदल हवा आहे.
विद्यमान पदाधिकार्यांना किमान आणखी एक वर्ष तरी सत्ता हवी आहे. यासाठी त्यांचा आटापिटा राहणार आहे. त्यामुळे पदाधिकारी
बदलाचा जुगार भाजप पक्षश्रेष्ठी कसा हाताळतात, हे पाहावे लागणार
आहे. भाजप जि.प. मध्ये
काठावर आहे. भाजपाचे 25 सदस्य आहेत.
त्यांना शिवसेनेचे तीन, रयत विकास आघाडीचे चार,
अजितराव घोरपडे यांचे दोन आणि खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी
पक्षाचा एक अशा दहा जणांचा पाठिंबा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे
25 सदस्य आहेत. भाजपाने पदाधिकारी बदलाच्या प्रकरणात
जरा जरी चूक केली तरी त्यांना ती महागात पडू शकते. त्यामुळे त्यांना
हा बदल फार सावधपणे हाताळावा लागणार आहे.

No comments:
Post a Comment