Monday, October 8, 2018

ताप अंगावर काढू नका!

राज्यात स्वाइनचे 88 बळी
मुंबई:
राज्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून उपचाराला विलंब होत असल्याने मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी तापाच्या रुग्णांना औषधोपचारानंतर 24 तासांत ताप कमी न झाल्यास तातडीने 'ऑसेलटॅमीवीर' गोळय़ा द्याव्यात, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज केले. स्वाइन फ्लूच्या बळीची संख्या 88 वर गेली असून सध्या विविध रुग्णालयांत सुमारे 900 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
पुणे व नाशिकपाठोपाठ राज्यातील अन्य जिह्यांतही स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत असून या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज मंत्रालयात राज्याच्या साथरोग नियंत्रण समितीची तातडीची बैठक घेतली.
गेल्या दोन महिन्यांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आरोग्यमंत्र्यांनी स्वाइन फ्लू, डेंग्यू आदी साथीच्या आजारांचा आढावा घेतला. राज्यात सध्या स्वाइन फ्लूचे 892 रुग्ण आहेत. आतापर्यंत 88 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात नाशिक व पुणे विभागातील रुग्णांची संख्या जास्त आहे. जानेवारीपासून तब्बल 15 लाख 61 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 23 हजार 905 संशयित रुग्णांना 'ऑसेलटॅमीवीर' गोळय़ा देण्यात आल्या आहेत. 892 बाधित रुग्णांपैकी 337 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून 463 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. पुणे महापालिका क्षेत्रात 44 तर नागपूर येथे तीन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यात नाशिक विभागात 26, पिंपरी-चिंचवड मनपा क्षेत्रात 18, नगर 8, पुणे मनपा क्षेत्रात 8, सातारा व ग्रामीण क्षेत्रात प्रत्येकी 6, सोलापूर -3, अकोला, नागपूर, चंद्रपूर, जळगाव प्रत्येकी 2, तर कोल्हापूर, वाशीम, धाराशीव, बुलढाणा आणि मीरा-भाईंदर येथे प्रत्येकी एक अशा एकूण 87 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यात 44 रुग्ण व्हेंटिलेटरवर
पुणे, नाशिक विभागात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. राज्यात व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांवर नेमके काय उपचार करावे याबाबत आरोग्य विभागाकडून खासगी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी प्रोटोकॉल तयार करण्यात येत आहे. त्याचा अवलंब खासगी व्यावसायिकांनी करावा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.(सामना)

No comments:

Post a Comment