Tuesday, October 9, 2018

प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांची सोडवणूक व्हावी


शिक्षक संघाची सभापती शिवाजी शिंदे यांच्याकडे मागणी
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांचा निपटारा लवकरात लवकर व्हावा, अशी मागणी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने पंचायत समितीचे सभापती शिवाजी शिंदे यांच्याकडे करण्यात आली. शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने श्री. शिंदे यांची भेट घेतली.
प्रारंभी शिवाजी शिंदे यांची पंचायत समितीच्या प्रभारी सभापती पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. वेतन तसेच वैद्यकीय फरक बिले शिक्षकांच्या खात्यावर त्वरीत वर्ग करण्यात यावीत. वरिष्ठ वेतनश्रेणी मिळालेल्या शिक्षकांची सेवापुस्तके अद्ययावत करून पडताळणीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात यावीत. शिवाय तालुक्यात सर्वच शिक्षकांची सेवापुस्तके अद्ययावत करण्यात यावीत. यासाठी केंद्रस्तरावर कॅम्प लावावा, अशी मागणी सभापती शिंदे यांच्याकडे करण्यात आली.
दरम्यान, शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाच्या भेटीची तातडीने दखल घेऊन शिक्षण विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांची बैठक बोलावून सविस्तर चर्चा केली. यावेळी गटशिक्षणाधिकारी बी.एन. जगधने, लिपिक श्री. इंडिकर, मुलाणी उपस्थित सेवापुस्तके अद्ययावत करण्यासाठी तातडीने कॅम्प लावला जाईल, असे सांगितले. सध्या शिक्षण विभागाला कर्मचारी संख्या कमी आहे. सध्याला एक पूर्णवेळ आणि एक आठवड्यातून तीन दिवस कर्मचारी दिला आहे. आणखी कर्मचारी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे शिवाजी शिंदे म्हणाले.
यावेळी शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष व शिक्षक बँकेचे संचालक विनायक शिंदे, तालुकाध्यक्ष देवाप्पा कारंडे, फत्तु नदाफ, सुरेश पाटील, जकाप्पा कोकरे, दिलीप पवार, कृष्णा तेरवे, विठ्ठल कोळी, नाना पडोळकर, ज्ञानेश्वर टोणे, अजीम नदाफ,  अशोक भोसले आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment