Monday, October 8, 2018

उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली


जत,(प्रतिनिधी)-
नवरात्रोत्सव काळात लोक मोठ्या प्रमाणात उपवास करतात. त्यामुळे दर वर्षीच उपवासाच्या पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असते. यंदाही शेंगदाणे, साबुदाणा, राजगिरा, भगर आदी उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. या पदार्थांची आवक वाढली असल्याने दरात मागील वर्षीच्या तुलनेत 10 ते 15 टक्क्यांनी घट झाली असल्याचे सांगण्यात आले.

 नवरात्रींच्या उपवासानिमित्त भाविकांकडून साबुदाणा, भगर, राजगिरा,  शेंगदाणे यांसह त्यांपासून तयार होणार्या पिठांना दरवर्षी मोठी मागणी राहते. घटस्थापनेच्या अगोदरपासून उपवासाच्या साहित्यांना मागणी वाढण्यास सुरवात झाली आहे. एक्स्ट्रा सुपर फाईन, मिल्क व्हाईट आणि साधा या प्रकारामधील साबुदाणा आणि गुजरात जाडा, कर्नाटक घुंगरू आणि स्पॅनिश आदी प्रकारातील शेंगदाणा बाजारात दाखल होत आहे. उपवासाची दशमी, पुरी, भाजणी, थालिपीठ तयार करण्यासाठी भाविकांकडून भगर पीठ, राजगिरा पीठ, साबुदाणा पीठ, कुट्टूपीठ आदींची खरेदी करण्यात येत आहे. येथील घाऊक बाजारात राजगीरा पीठाला 180 रुपये, साबुदाणा पीठ 140 रुपये, भगर पीठ 160 रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.
दरम्यान, फळांनाही मागणी वाढली आहे. उपवासानिमित्त नऊ दिवस विविध प्रकारच्या फळांना ग्राहकांकडून मागणी असते. केळी, सफरचंद, कलिंगड, पपई, चिक्कू, पेरू, अननस, सीताफळ, संत्रा, मोसंबी, डाळिंब आदी प्रकारच्या फळांना मागणी वाढली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या फळांना मागणी वाढली आहे. आवकही चांगली असल्याने दरात फार मोठी वाढ झाली नाही.

No comments:

Post a Comment