Monday, October 8, 2018

म्हैसाळ योजना अखेर सुरू झाल्याने शेतकर्‍यांना दिलासा


जत,(प्रतिनिधी)-
गेली अनेक दिवस लांबलेले म्हैसाळ सिंचन योजनेचे आवर्तन अखेर काल सुरू झाले. दुपारी पहिल्या टप्प्यातील काही पंप सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. पाण्याचे आवर्तन किमान दोन महिने सुरु राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिरज, तासगाव, जत, कवठेमहांकाळ आणि सांगोला या पाच तालुक्यातील शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात  यंदा अजिबात पाऊस झाला नसल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. टेंभू आणि ताकारी योजना सुरु झाल्या; मात्र म्हैसाळ योजना बंद होती. शेतकर्यांनी पावसाच्या आशेने म्हैसाळ योजनेच्या पाण्याची मागणी नोंदवली नव्हती. योजनेचे गेल्या हंगामातील आवर्तन 3 जुलै रोजी बंद झाले होते. म्हैसाळ योजनेची 30.94 कोटी वीजबिल याशिवाय 25 कोटी पाणीपट्टी असे मिळून 55 कोटी 94 लाख थकीत होते. योजनांसाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून 24.25 कोटी रुपये देण्यात आले होते, त्यापैकी 10 कोटी रुपये म्हैसाळ योजनेसाठी भरण्यात आले. मागील आवर्तनातील उपशाचे 19 टक्के बिल शेतकर्यांनी आणि उर्वरीत 81 टक्के शासनाने जमा केले. होते. त्यामुळे योजना सुरू करण्याची मागणी वाढली होती; प्रत्यक्षात मागणी अर्ज मात्र शेतकरी भरत नव्हते.
गेल्या काही दिवसांत योजनेच्या अधिकार्यांनी तालुकानिहाय शेतकर्यांच्या बैठका घेऊन मागणी नोंदवण्याचे आवाहन केले होते. त्याला शेतकर्यांनी प्रतिसाद दिल्याने उपसा सुरु करण्यात आला. योजनेचे आवर्तन किमान दोन महिने सुरु राहील. सध्या फक्त मुख्य कालव्यातून पाणी सोडू; मागणीनुसार उपकालवे, शाखा कालवे आणि वितरिकांचे दरवाजे उघडले जातील. शेतकर्यांनी पैसे भरले तरच पाणी मिळेल, असे अधिकार्यांनी सांगितले.
दरम्यान, जत तालुक्यातील बिरनाळ तलावातून जत शहराला पाणी पुरवठा केला जातो. या तलावातील पाणी आणखी काही दिवसच पुरणारे आहे. योजनेचे पाणी तलावात सोडून तो भरून घेतल्यास पुढील वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. मागील खेपेस याच तलावातून तालुक्यातील टंचाई गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला होता. आता या पाण्याने तालुक्यातील प्रतापपूर, तिप्पेहळ्ळी,कुंभारी, शेगाव, बनाळी या भागातील तलाव भरून घेण्यास मदत होणार आहे.

No comments:

Post a Comment