जत,(प्रतिनिधी)-
सातबारा उतार्यावर आता शेतकरीनिहाय (खातेदार)
पिकांच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी
सातबारा उतार्यामध्ये नव्याने एक कॉलम तयार करण्यात येणार आहे.
त्यामध्ये कोणत्या शेतकर्याने कोणते पीक घेतले
आहे,याची आकडेवारी उपलब्ध होणार आहे.त्याचबरोबर
नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकर्यांना नुकसान भरपाई तसेच हमीभावाने
पिकांची खरेदी झाल्यास सबसिडी मिळण्यास मदत होणार आहे.
ग्रामीण भागात गावपातळीवर जमिनीचे महसूल
लेखे ठेवण्याकरिता विविध गाव नमुने व दुय्यम नोंदवह्या तलाठ्यांकडून वापरल्या जातात. यामधील गाव नमुना हा नंबर सात हा अधिकार अभिलेख विषयक
असून गाव नमुना वारा पिकांची नोंदवही ठेवण्यासंदर्भात आहे. यामधील
पिकांच्या नोंदी या संबंधित तलाठी यांनी घ्यावयाच्या असतात. सद्यस्थितीत
एका सर्व्हे नंबर अथवा गट नंबरमध्ये समजा दहा खातेदारांची नोंद असेल तर त्यांची एकत्रित
पिकांची नोंद घेतली जाते. त्यामुळे सातबारा उतार्यामधील कोणत्या शेतकर्यांनी कोणते पीक लावले आहे,याची स्वतंत्र नोंद सातबारा उतार्यावर नसते.
त्यामुळे शेतकरीनिहाय पिकांची यादी शासन दरबारी उपलब्ध होत नाही.
ती व्हावी यासाठी आता शेतकरीनिहाय पिकांची नोंद सातबारा उतार्यावर घेण्यासाठी स्वतंत्र कॉलम, सातबारा उतार्यामध्ये तयार करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे.
No comments:
Post a Comment