Monday, October 1, 2018

होमगार्ड जवानांना आता विमा संरक्षण


जत,(प्रतिनिधी)-
कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार्या होमगार्ड जवानांना विमा योजना लागू करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. मागील पाच वर्षात मृत्यू झालेल्या तसेच जखमी झालेल्या सर्व होमगार्डची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
महाराष्ट्र राज्यात होमगार्ड संघटनेची स्थापना होऊन 72 वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, होमगार्ड अनेक वर्षांपासून विमा, समान वेतन, समान काम यासह अनेक मागण्यांसाठी संघर्ष करीत आहेत.मात्र त्यांना न्याय मिळत नव्हता. महाराष्ट्रातील होमगार्डंना सन्मानाची वागणूक मिळावी,यासाठी विविध प्रयत्न होत आहेत. आता त्यातलाच एक भाग म्हणून त्यांना विमा संरक्षण मिळणार आहे.
या संदर्भात गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील आणि होमगार्ड महासमादेशक संजय पांडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे नुकतीच होमगार्ड प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी होमगार्डच्या आठ मागण्यांवर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार शासनाने होमगार्ड जवानांना विमा योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश दिले होते. मुंबईतील महासमादेशक कार्यालयाने राज्यातील 35 जिल्ह्यातील सर्व जिल्हा समादेशकांना मागील पाच वर्षात मृत्यू पावलेल्या सर्व होमगार्ड जवानांची माहिती मागवली होती. सध्या याबाबतच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

No comments:

Post a Comment