Monday, October 8, 2018

तरुणाने केला आठ दिवसांत सात हजार किलोमीटरचा प्रवास


इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद
सांगली,(प्रतिनिधी)-
 सलग आठ दिवस न थांबता, सांगली ते कन्याकुमारी, कन्याकुमारी ते वाघा बॉर्डर आणि तिथून पुन्हा सांगली असा थक्क करणारा प्रवास चारचाकी मोटारीतून करून मिरज तालुक्यातील कर्नाळ येथील दिगंबर शिंदे या तरुणाने आठ दिवसांत तब्बल सात हजार किलोमीटरचा प्रवास करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदविला आहे. दिलेल्या वेळेच्या उद्दिष्टापेक्षा कमी वेळेत त्याने हे अंतर पार करीत विक्रमाला गवसणी घातली.
 दिगंबर बळवंत शिंदे या कर्नाळमधील युवकाने बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर वाहनचालक म्हणून काम सुरू केले. वाहन चालविण्याची त्याची कला सर्वांना थक्क करीत होती. त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याला प्रवासाचा विक्रम करण्याबाबत प्रोत्साहन दिले. त्यानंतर फेब्रुवारी 2018 मध्ये दिगंबरने याबाबतचा प्रस्ताव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडे पाठविला. त्यांनी कागदपत्रांची, वाहनाची छाननी करून त्याचा प्रस्ताव स्वीकारला. सांगली ते कन्याकुमारी, कन्याकुमारी ते वाघा बॉर्डर आणि तिथून पुन्हा सांगली अशा टप्प्यात अखंडितपणे प्रवास करण्याचे उद्दिष्ट त्यांनी दिगंबरला दिले. तब्बल 7 हजार 588 किलोमीटरचा हा प्रवास आठ दिवसात करण्याचे बंधन त्याच्यावर होते.
     सांगलीच्या गणपती मंदिरापासून 8 जुलै रोजी त्याचा हा प्रवास सुरू झाला. वाहनाला जीपीएस प्रणाली व दोन्ही बाजूस कॅमेरे लावण्याची अट घालण्यात आली होती. त्याप्रमाणे दिगंबरने वाहनाला या गोष्टी बसविल्या. अखंडितपणे त्याचा हा प्रवास सुरू होता. सांगली ते कन्याकुमारी हे अंतर 48 तासात पूर्ण करायचे होते, ते दिगंबरने 21 तास 30 मिनिटात पूर्ण केले. त्यानंतर कन्याकुमारी ते वाघा बॉर्डर हे 3 हजार 800 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी 72 तासांचे उद्दिष्ट होते, ते त्याने 66 तासात पूर्ण केले. तिथून तो पुन्हा सांगलीला परतला. आठ दिवसांचे उद्दिष्ट असताना, त्याने हा संपूर्ण प्रवास केवळ साडेसात दिवसात पूर्ण करीत विक्रमाला गवसणी घातली. त्यानंतर याबाबतची सर्व माहिती, चित्रीकरण, जीपीएस प्रणालीवरील नोंदी हे सर्व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला पाठविण्यात आले. त्याची छाननी करून, त्याला नुकतेच विक्रमाची नोंद झाल्याचे प्रमाणपत्र व पदक पाठविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment