Monday, October 1, 2018

पशुवैद्यकीय उपचारांसाठी शासनाने पशुसखी नेमाव्यात


जत,(प्रतिनिधी)-
ग्रामीण भागात कोंबड्या, मेंध्या, शेळ्या, गाई, म्हशी या प्राण्यांना प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक गावात व वाड्यावस्त्यांवर पशुसखींच्या नेमणुका करण्यासाठी शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेण्याची मागणी महिला वर्गातून होत आहे.
 ग्रामीण भागात प्रामुख्याने महिलाच प्राण्यांचे दैनंदिन संगोपन करताना दिसतात. त्यांना औषधे, आहार देण्यासाठी पशुसखींना आशा वर्करच्या धर्तीवर प्रशिक्षण दिल्यास पशुधनाचे संवर्धन होण्यास मदत होईल. याशिवाय पशुसखींनाही रोजगार उपलब्ध होईल. कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी पाळणार्यांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत पशुवैद्यकांची संख्या कमी आहे. एका डॉक्टरवर चार ते पाच गावे आणि दहा-बारा वाड्यावस्त्यांवरील पशुधनाची जबाबदारी असते. शिवाय अलिकडे शासनाने डॉक्टरांची,पशुवैद्यकांची भरतीच केली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी जनावरांचे डॉक्टर लवकर उपलब्ध होत नाहीत. याचा परिणाम म्हणजे आजार वाढून जनावरे दगावण्याची शक्यता अधिक असते.
जनावरांच्या किंमती भरमसाठ असल्याने शेतकर्यांना एकदम मोठा आर्थिक फटका बसतो.महिला सबलीकरणाच्या धोरणानुसार महिलांना पशुधनावर प्राथमिक उपचार करण्याचे प्रशिक्षण द्यावे.राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्यामाध्यमातून  प्रत्येक गावात लोकसंख्येनुसार किमान पाच-सहा पशुसखींच्या  नेमणुका कराव्यात.त्यामुळे गुरांना व प्राण्यांना तातडीने औषधोपचार मिळण्यास मदत होईल. पशुसखींच्या नेमणुका होण्यासाठी व त्यांना प्रशिक्षण मिळावे, यासाठी सरकारी पातळीवरदेखील पुढाकार घेण्याची गरज आहे.



No comments:

Post a Comment