जत,(प्रतिनिधी)-
विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कोणतीच खळखळ
न केल्याने जत पंचायत समितीच्या सभापतीपदी अपेक्षेप्रमाणे भाजपाच्या सौ. सुशिला तावंशी यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर त्यांचा आमदार विलासराव जगताप यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
दरम्यान, सायंकाळी सौ. तावंशी
यांची त्यांच्या गावी बसरगी येथे गुलालाच्या उधळणीत मिरवणूक काढण्यात आली.
सौ. मंगल जमदाडे यांनी सभापती पदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती.
भाजपाची पहिल्यांदाच जत पंचायत समितीवर सत्ता आल्यावर सौ. जमदाडे यांना पहिली संधी मिळाली होती. सव्वा वर्षांची
कारकीर्द त्यांना मिळाली. ठरल्याप्रमाणे त्यांनी राजीनामा दिला.
दुसर्यांदा सभापतीपदाची संधी सौ. सुशिला तावंशी यांना निश्चित होती आणि अपेक्षेप्रमाणे
सभापतीची माळ त्यांच्या गळ्यात पडली. तहसीलदार सचिन पाटील यांनी
या निवडीसाठी विशेष सभा बोलावली होती. निवडणुकीच्या कार्यक्रम
पत्रिकेनुसार सौ. तावंशी यांनी सकाळी अकरा वाजता नामनिर्देशन
पत्र सादर केले. विरोधी पक्षाकडून कोणीही उमेदवारी अर्ज दाखल
केला नसल्याने दुपारी एक नंतर सौ. तावंशी यांची सभापतीपदी निवड
जाहीर करण्यात आली.
निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार सचिन
पाटील यांनी तर सहाय्यक सचिव म्हणून अर्चना वाघमळे यांनी काम पाहिले. निवडीनंतर आमदार जगताप यांच्याहस्ते नूतन सभापती सौ.
तावंशी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे
सर्व सदस्य उपस्थित होते. सत्कारानंतर सौ.तावंशी म्हणाल्या, पक्षाने मला संधी दिल्याबद्दल त्यांचे
व आमदार श्री. जगताप यांची आभारी आहे. पक्षाच्या
ध्येयधोरणानुसार काम करताना सामान्य लोकांची कामे व्हावीत,यासाठी
आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, सौ. तावंशी यांच्या गावी बसरगी
येथे सायंकाळी त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शिवाप्पा
तावंशी, उपसरपंच किशोर बामणे,चिदानंद तावंशी,
हणमंत पटेद, तुळशीराम बामणे, विजय बामणे,सुरेश बंजत्री, अप्पासाहेब
नामद आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment