जत,(प्रतिनिधी)-
या वर्षी पावसाळ्याचे महिने संपले तरी
एकही पाऊस झाला नाही. परतीचा पाऊस येईल,
अशी आशादेखील आता फोल ठरली आहे. कारण परतीच्या
पावसाने गपचिपचे राज्यातून काढता पाय घेतला आहे. खरिप गेला,
रब्बीची शाश्वती राहिलेली नाही. यामुळे शेतकर्यांसह सर्वच घटकांमध्ये चिंतेचे वातावरण
आहे. याचा थेट परिणाम तालुक्यातल्या आठवडी बाजारांवर झाल्याचे
चित्र दिसत आहे. बाजारात कुठल्याच मालाला उठाव नसल्याने दुष्काळाचे
सावट गडद होत चालले आहे.
जत हा सांगली जिल्ह्यातल्या पूर्व भागातला
परंपरागत दुष्काळी तालुका आहे. स्वातंत्र्याची
सत्तर वर्षे उलटली तरी हा दुष्काळ काही मिटायला तयार नाही. राजकारण्यांची
आश्वासनाने ऐकून लोकांचे कान विटून गेले आहेत. अजूनही इथल्या शेतकर्यांना सातत्याने दुष्काळाशी दोन
हात करावे लागत असून यामुळे तो पार वैतागून गेला आहे. तालुक्यातला
शेती हा मुख्य व्यवसाय असला तरी हा आतबट्ट्यातला व्यवहार ठरत आहे. साहजिकच अनेकांनी शेतीला रामराम ठोकला असून रोजंदारीवर शहराकडे पळ काढला आहे.
कित्येकांनी पवन चक्क्यांच्या हवाली आपल्या जमिनीकरून त्यातून मिळालेल्या
पैशांतून प्रपंच चालवत आहेत.
तालुक्यात एकही मोठी नदी नसल्याने राजकारण्यांनी
बाहेरच्या म्हणजे कृष्णेच्या पाण्याची आस लावून लोकांना झुलवत ठेवले. त्यावर राजकारण केले.पण प्रत्यक्षात
फायदा काही लोकांच्या पदरात पडला नाही. पाण्याची वाट पाहात एक
पिढी गेली आहे, आता दुसरी पिढीदेखील त्याच वाटेवर आहे.
या कालावधीत तालुक्यातल्या पश्चिम भागातील वीसएक
गावांना म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी आले आहे. एवढ्यावर
येथील शेतीची परिस्थिती बदलली आहे. पाणी आल्याचा परिणाम काय होते,
हे गावांच्या बदललेल्या अर्थकारणावरून दिसून येते. मात्र बाकी शंभर गावांचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
कर्नाटकातून पाणी आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा भास दाखवला जात आहे.
पण गेल्या पन्नास वर्षात कृष्णेचे पाणी आणायचे जमले नाही, तिथे कर्नाटकातून पाणी कसे आणले जाईल, असा सवाल उपस्थित
केला जात आहे.
सततच्या दुष्काळाने शेतकरी वैतागला आहे. त्याच्या पाठोपाठ व्यापारी, व्यावसायिकही
हतबल झाले आहेत. वाढती महागाई, जीएसटीचा
फेरा याने सर्वांनाच घाईला आणले आहे. साहजिकच लोक पैसा अक्षरश:
पुरवून पुरवून वापरत आहेत. उद्या कोणती परिस्थिती
ओढवेल,याची कल्पना नसल्याने लोक कोणत्याच गोष्टीत धाडस करताना
दिसत नाहीत. त्यामुळे सध्या मोजून मापून खायचे, गरजेपुरते नेसायचे, आहे त्या निवार्यावर रात्र काढायची, आणि आला दिवस पुढे ढकलायचा,
असे सध्या चालले आहे.
खरिप हंगाम वाया गेला,पण भरपाई मिळाली नाही. रब्बीची चिंता
डोक्यात आहे. त्यामुळे मोठी खरेदी, चैन,
थाटमाट याला फाटा दिला जात आहे. बाजारातही लागेल, तेवढेच लोकांकडून उचलले जात आहे. त्यामुळे व्यापारी,व्यावसायिकही चिंतेत आहेत. दर आठवड्याला घरी येणार्या खाऊची आतुरतेने वाट पाहणार्या लहानग्यांची आता कधी
कधी निराशा होऊ लागली. त्यांच्या तोंडाकडे पाहिल्यावर मोठ्यांच्या
पोटात कालवाकालव होऊ लागली आहे. दुष्काळाची ही भीषणता पाहता यंदा
ऊसतोडणीला जाणार्या मजुरांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.
अनेक गावात पाऊस नाही पडला तर ऊसतोडीला जाऊ, असाच
सूर ऐकायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत शासनाची तात्काळ मदत मिळणे
गरजेचे आहे. त्यांचा अंत किती पाहावा, यालाही
काही मर्यादा आहेत.

No comments:
Post a Comment