जत पंचायत समिती सभेत ठराव: पाणी उपसा बंदी
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक
शाळेवर काही पुढारीपण करणार्या शिक्षकांनी पाच-सहा हजार रुपये देऊन काही सुशिक्षित तरुणांना झिरो शिक्षक म्हणून नेमले आहे.
अशा शिक्षकांची नेमणूक करून शासनाचा फुकट पगार लाटणार्या पुढारीपणा शिक्षकांवर कारवाई करण्याचा ठराव जत पंचायत समितीच्या मासिक बैठकीत
घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सभापती शिवाजी शिंदे होते.
जत तालुक्यातील शिक्षण विभागाला कोणताच
धरबंद राहिलेला नाही. शिक्षण विभागातील अधिकार्यांचा शिक्षकांवर वचक राहिलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील
शिक्षक शाळेत वेळेवर जात नाही. पाच-सहा
हजार रुपये देऊन काही शिक्षकांनी शाळांमध्ये सुशिक्षित तरुणांची नियुक्ती केली आहे.
अधिकार्यांचे अशा कामचुकारपणा व पुढारीपणा करणार्या शिक्षकांशी लागेबांधे आहेत. त्यामुळे अशा शिक्षकांवर
कोणतीही कारवाई होत नाही. असा आरोप करण्यात आल्यानंतर शिक्षण
विस्तार अधिकारी आर. डी. शिंदे यांनी सभागृहाला
उत्तर-सुलट उत्तर दिले. याबद्दल गटविकास
अधिकारी अर्चना वाघमळे यांनी नाराजी व्यक्त केली. श्री.
शिंदे यांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा घेण्यात यावा, असा आदेश त्यांनी संबंधितांना दिला.
तसेच बोगस शिक्षक नेमून स्वत: भटकणार्या शिक्षकांवर कारवाई करण्याचा
ठराव घेण्यात आला. यावेळी विकास आराखडा न देणार्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दिग्विजय
चव्हाण यांनी केली. यावर आराखडा न देणार्या नऊ ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली आहे. अन्य ग्रामसेवकांवरदेखील लवकरच कारवाई करू, असे गटविकास
अधिकारी सौ. वाघमळे यांनी सांगितले.
सध्या तालुक्यात तीव्र पाणी टंचाई आहे. उपलब्ध पाणीसाठा राखून ठेवण्यासाठी उपसाबंदी आदेश लागू
करावा तसेच पाण्याचे टँकर भरोन देण्याची व्यवस्था फक्त बिरनाळ तलावातून करू नये,
जत शहराला पाणी पुरवठा करणार्या या तलावात साठा
कमी आहे. पुढे शहराला पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे.
त्यामुळे इतर तलावातून पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था व्हावी,
अशी मागणी आप्पासाहेब मासाळ आणि अॅड. आडव्याप्पा घेरडे यांनी केली.
या सभेत जत तालुक्यातील आरोग्य, रस्ते, घरकुल बांधकाम, स्वच्छता अभियान आदी विषयांवर चर्चा झाली. या चर्चांमध्ये
मंगल जमदाडे, श्रीदेवी जावीर, अश्विनी चव्हाण, रवींद्र सावंत आदी सदस्यांनी सहभाग घेताला.
अर्चना पाटील, रामाण्णा जीवन्नावर, सुशिला तावंशी, लक्ष्मी माळी आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment