Monday, October 1, 2018

बिरोबा बनातील दसरा मेळाव्यात क्रांतीचा मुहूर्त : प्रकाश शेंडगे


जत,(प्रतिनिधी)-
 मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला आरक्षणाच्या बाबतीत दिलेले आश्वासन पाळले नसल्याने समाजामध्ये नाराजी आहे. समाज क्रांती घडविण्याच्या दिशेने पावले टाकत असून दि.16 ऑक्टोबर रोजी आरेवाडीतील बिरोबाच्या बनात दसरा मेळाव्यात क्रांतीचा मुहूर्त होणार आहे. हा मेळावा आरेवाडी देवस्थान ट्रस्टने बोलवला असून सर्वच राजकीय पक्षातील समाजाच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सोमवारी सांगलीत पत्रकारांना दिली. 
    भाजपपासून फारकत घेतल्याचे सांगत भाजपच्या स्थानिक नेत्यांची लायकी काढत गोपीचंद पडळकर यांनी आरेवाडीतील दसरा मेळाव्यासाठी जनजागृती सुरू केली आहे. त्यांनी गुजरातमध्ये जाऊन पटेल आरक्षणाचे नेते हार्दिक पटेल यांनाही निमंत्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर शेंडगे यांनी सांगलीत जाऊन पत्रकार बैठक घेतली व आरेवाडीतील दि. 16 रोजीचा  दसरा मेळावा देवस्थान ट्रस्टने घेतल्याचे सांगितले आहे. यावेळी देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारीही उपस्थित होते. त्यांनी या मेळाव्याला आमदार गणपतराव देशमुख, माजी मंत्री अण्णा डांगे, माजी आमदार प्रकाश शेंडगे, रमेश शेंडगे, आमदार रामहरी रुपनवार, दत्ताअण्णा भरणे, नारायण पाटील यांच्याबरोबर अनेक नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. गोपीचंद पडळकर यांनाही निमंत्रण देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. मेळाव्याचे श्रेय कोणा एका नेत्याला जाऊ नये, यासाठीचा हा खटाटोप असल्याची चर्चा आहे.

No comments:

Post a Comment