कोल्हापूरची अंबाबाई. हिचा उल्लेख आपण नेहमीच करतो. कारण महाराष्ट्रातील कोल्हापूर
या शहराचा ‘दक्षिणेकडील काशी’ असा मोठा
गौरवपूर्वक उल्लेख पुराण कथांमधून सापडतो. या दक्षिण काशीची अधिष्ठात्री
देवता कर्नाटक व महाराष्ट्राची कुलस्वामिनी करवीरनिवासिनी महालक्ष्मी आई अंबाबाई ही
होय. देवी अंबाबाईचे मंदिर व तेथील मूर्ती अत्यंत पुरातन असल्याचा
दाखला व सनदा मिळतात. म्हणूनच खर्या अर्थाने
ती अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते. आदिशक्ती पार्वतीच्या
मातृस्वरूपाला ‘अंबा’ किंवा ‘अंबा भवानी’ म्हणतात. हीच महाकाली,
महालक्ष्मी व महासरस्वती या रूपांनी त्रिविध व त्रिगुणात्मक बनते.
हिची रूपे व नावे अनंत आहेत.
कोल्हापूरच्या महालक्ष्मीला
‘अंबाबाई’ म्हणतात. कोल्हापूर
या शहराला कोल्हापूर हे नाव कसे पडले, या संबंधीची कथा व्यासांनी
लिहिलेल्या ‘करवीर महात्म्य’ या ग्रंथात
दिली आहे. ज्या वेळी असुरांनी पुराणकाळात देवादिकांना,
पृथ्वीनिवासीयांना त्राही करून सोडले, पृथ्वी कंपित
झाली. त्रस्त, कष्ट व पीडा देणार्या सर्व असुरांत ‘कोल्हासूर’ नामक
दैत्य ज्येष्ठ व श्रेष्ठ होता. सर्व असुरांचे नेतृत्व त्याच्याकडे
होते. शेवटी भूमाता शेष याच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी महालक्ष्मीचे
रूप घेतले व त्या कोल्हासुराचा वध केला; पण या कोल्हासुरावर शंकर
फार खूश होते. मरताना त्याने शंकराची अखेरची प्रार्थना केली.
तेव्हा तो म्हणाला ‘महालक्ष्मीची माझ्यावर जी कोपमय
दृष्टी आहे, ती संपूर्णपणे घालवून देऊन मला मुक्ती मिळावी,
असे आपण काहीतरी करा.’ त्यानुसार शंकराने देवीकडे
प्रार्थना केली. त्या वेळी देवी प्रसन्न झाली व कोल्हासुरास म्हणाली,
‘तुझे युद्ध व पश्चात्ताप बघून मी संतुष्ट झाले
आहे. तुला हवा तो वर माग.’ तेव्हा
‘माझे शरीर गयातीर्थ व्हावे. तेथे जे श्राद्ध,
तर्पण व पिंडदान करतील, त्यांच्या पितरांस मुक्ती
मिळावी. माझ्याही ह्या तीर्थाचे माहात्म्य असावे’ असा लोकहितार्थ वर कोल्हासुराने मागितला. तसेच
‘सध्याच्या रूपाने तू माझ्याजवळ राहावेस, या ठिकाणाला
‘कोल्हासुर’ या नावाने प्रसिद्ध व्हावे.
माझी कीर्ती कायम राहण्याकरता कोहळा फळ तू या ठिकाणी छेदावेस.’
दैत्याची ही मागणी देवीने लगेच मान्य केली. तिच्या
पदस्पर्शाने कोल्हासुर निष्प्राण होऊन परमधामास गेला. ज्या ठिकाणी
हे घडले त्याला ‘कोल्हासुर’ हे नाव पडले.
कालांतराने ते ‘कोल्हापूर’ या नावाने रूढ झाले.
कोल्हापुरास ‘करवीर’ असेही एक फार जुने नाव असून, अजूनही प्रचारात आहे. कोल्हापुरास ‘दक्षिण काशी’ या नावाने संबोधतात. त्या मागे दोन कथा आहेत. एक कथा अशी की, काशीचा विश्वेश्वर व कोल्हापूरची
अंबाबाई यांच्यात श्रेष्ठ कोण, याबद्दल तेव्हा विष्णूने तराजूच्या
एका पारड्यात कोल्हापूर घातले व दुसर्या पारड्यात काशीस घातले.
तेव्हा कोल्हापूरचे पारडे जड झाले. म्हणून शंकराने
काशी सोडली व तो कोल्हापुरास येऊन राहिला. या वेळेपासून कोल्हापूर
ही ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
कोल्हापूर हे महालक्ष्मीचे ‘आद्यपीठ’ असल्याचे सांगून इथे जलरूपाने महादेव, पाषाणरूपाने श्रीविष्णू,
वृक्षरूपाने देवता आणि वालुक रूपाने मुनिवृंद राहतात, असे नारदाने मार्कंडेय ॠषींना सांगितले, जेव्हा ते अल्पकाळ
तप करून पुण्यलाभ कुठे होईल, याचा विचार करत होते. मंदिराचे वर्णन - महालक्ष्मीचे देऊळ शहराच्या मध्यभागी
असून, जुन्या राजवाड्याच्या वायव्येस आहे, त्याची पूर्व-पश्चिम लांबी
202 फूट व दक्षिणोत्तर लांबी 150 फूट आहे.
प्राचीन देवळाचा मूळचा भाग फक्त दुमजली होता. त्यावर
संकेश्वराच्या मठाचे अधिपती शंकराचार्यांनी घुमट व शिखर बांधले.
कळस अंदाजे 65 फूट उंचीवर आहे. आजचे मंदिर त्रिशुळाकृती किंवा पद्माकृती असून, ते पश्चिमाभिमुख आहे. मंदिराकरता वापरलेला दगड काळ्या भुरकट
रंगाचा असून, तो कठिण व काहीसा खडबडीत आहे. हे सुमारे 300 वर्षे निरनिराळ्या राजांच्या कारकीर्दीत
स्थापत्यशैली, वास्तुशिल्प पद्धतीने बांधले गेले होते.
मंदिराच्या वर्णनावरून ते चालुक्याच्या काळात इ. स. 600 ते 700 मध्ये बांधले असण्याची
शक्यता आहे. या पुरातन देवालयातील श्री अंबामातेची मूर्ती काळ्या
पाषाणाची सुमारे पावणे चार फूट उंच व उभी असून, ती चौभूजा आहे.
महालक्ष्मी, अंबाबाई, अंबामाता,
आई, करवीरनिवासिनी इत्यादी नावांनी ओळखली जाते.
महालक्ष्मी हे नाव प्राचीन असले, तरी अंबाबाई हे
कोल्हापूरची श्री अंबाबाई नाव अर्वाचीन आहे. ही देवीची मूर्ती
देवळाच्या पूर्वेस मोठ्या शिखराखाली बसवली असून, तिच्या उत्तरेस
व दक्षिणेस दुसर्या लहान शिखरात महाकाली व महासरस्वती यांच्या
मूर्ती आहेत. तिच्या मागे दगडी सिंह उभा आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्रा आहे.
मूर्तीची
स्थापना इ. स. तिसर्या शतकात झाली असावी, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
प्रवेशद्वारानंतर मुख्य मंडपास ‘गरुड मंडप’
म्हणतात. अश्विन नवरात्रोत्सवात
महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथर्यावर ठेवून तिची पूजा करतात. उत्सव - मंदिराची आणि पूजेअर्चेची व्यवस्था ठेवण्यासाठी एकंदर 20 पुजारी आहेत. प्रत्येक शुक्रवारी देवळाच्या पटांगणात
पालखीमधून देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. वर्षातून
3 वेळा उत्सव करण्यात येतो. पहिला उत्सव चैत्र
पौर्णिमेस तिची पितळेची प्रतिमा पालखीत ठेवून मिरवणूक काढण्यात येते, तर दुसर्या उत्सवात अश्विन महिन्यातील
पंचमीच्या दिवशी टेंबलाईच्या देवळापर्यंत 4.83 किलोमीटर अंतरापर्यंत
देवीची मिरवणूक काढली जाते. अश्विन पौर्णिमेला
दिवे आणि ज्योती लावून देवळाची आरास करण्यात येते व महाप्रसाद देवीला अर्पण करण्यात
येतो.
अंबाबाई
मंदिरातला किरणोत्सव दर वर्षी जानेवारी-फेब्रुवारी आणि नोव्हेंबरमध्ये
सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मीच्या देवळात विलक्षण घटना अनुभवास येते. ती म्हणजे 31 जानेवारी आणि 9 नोव्हेंबरला
सूर्याची किरणे दरवाजातून प्रवेश करून थेट महालक्ष्मीच्या मूर्तीच्या पायांवर पडतात;
तर 1 फेब्रुवारी आणि 10 नोव्हेंबरला
सूर्याची किरणे देवीच्या छातीपर्यंत पोहोचतात. 3, 2 फेब्रुवारीला
मावळतीच्या सूर्याची किरणे देवीच्या पूर्ण अंगावर पडतात. हा उत्सव
खूप मोठ्या उत्साहात पार पाडला जातो. याला महालक्ष्मीचा किरणोत्सव
म्हणतात. नमस्ते स्तु महामाये श्री पीठे सुर पूजिते । शंख चक्र
गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते ॥ हे महालक्ष्म्यष्टकम् म्हणून सर्व भक्त देवीला नमन
करतात.
No comments:
Post a Comment