जत,(प्रतिनिधी)-
कमी झालेला पाऊस आणि परतीच्या पावसाने लावलेली ओढ
यामुळे सांगली जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासन, भूजल सर्वेक्षण आणि विकास
प्राधिकरण आणि कृषी विभागाकडून करण्यात येत असलेल्या दुष्काळ आढाव्याच्या प्राथमिक
अहवालात सांगली जिल्ह्यातील पाच तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे समोर आले आहे.
दुष्काळ घोषित करण्यासाठी देशातील विविध राज्यांनी
व्यक्त केलेली मते विचारात घेऊन दुष्काळ मूल्यांकन करण्यासाठी केंद्राने नियम निश्चित केले आहेत. त्यानुसार सामान्य, मध्यम आणि गंभीर दुष्काळ असे निकष ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समिती गठीत करण्यात आली असून,
या समितीकडून तीन टप्प्यांमध्ये दुष्काळाचा आढावा घेण्यात येत आहे.
प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ,
खानापूर, आटपाडी, कडेगाव
तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे.
या दहा
तालुक्यांतील पिकांचे मोबाइल अॅपद्वारे प्रत्यक्ष सर्वेक्षण
केले जाणार आहे. पिकांचे नुकसान 33 टक्क्यांपेक्षा
जास्त असल्यास मध्यम स्वरुपाचा दुष्काळ, तर 50 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाण असल्यास गंभीर दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने राज्यात दुष्काळ घोषित करण्याच्या निकष आणि कार्यपद्धतीमध्ये
यंदापासून बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता जिल्हास्तरीय दुष्काळ
देखरेख समितीकडून याचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यस्तरीय
दुष्काळ देखरेख समितीकडून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. जिल्ह्यातील
शिराळा, वाळवा, पलूस,मिरज, तासगाव या पाच तालुक्यांमध्ये समाधानकारक स्थिती
असल्याचे म्हटले जात असले तरी या तालुक्यातल्या पूर्व भागात परिस्थिती कठीण आहे.
रब्बी हंगामाबाबत डिसेंबरअखेर प्रत्यक्ष पेरणी झालेले
क्षेत्र हे सामान्य क्षेत्रापेक्षा 85 टक्के किंवा
त्यापेक्षा कमी असल्यास मध्यम स्वरुपाचा दुष्काळ सूचित होणार आहे. तर, हे प्रमाण 75 टक्क्यांपेक्षा
कमी असल्यास गंभीर दुष्काळ सूचित केला जाणार आहे. मूल्यांकनाचे
दोन टप्पे असून, त्यामध्ये मध्यम आणि गंभीर दुष्काळ असल्याचे
जिल्हास्तरीय समितीच्या अहवालावरून निदर्शनास आल्यानंतर संबंधित तालुक्यांचे प्रत्यक्ष
क्षेत्रीय सर्वेक्षण करण्याच्या सूचना राज्यस्तरीय समितीकडून जिल्ह्यांना देण्यात येणार
आहेत. याबाबतचा अध्यादेश 28 जून
2018 रोजी राज्य सरकारने काढला आहे. त्यानुसार
जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील पिकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून
सांगण्यात आले.

No comments:
Post a Comment