जतच्या आमसभेत ठराव
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील भूजल पातळी घटण्याला
वाळू तस्करी कारणीभूत असून महसूलचे अधिकारी हफ्ता घेऊन तस्करांना पोसत आहेत. तस्करांवर कारवाई करण्याचा तसेच जत तालुका दुष्काळ जाहीर
करून त्वरीत उपाययोजना करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव आज (शुक्रवारी
) झालेल्या जत पंचायत समितीच्या आमसभेत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी आमदार विलासराव जगताप होते.
या सभेला मोठी गर्दी होती. वीज वितरण, दलित वस्ती सुधार रस्ते,
महसूल, शिक्षण आणि नगरपालिकेच्या कारभारावर जोरदार
चर्चा झाली. यावेळी विभागनिहाय आढावा घेऊन महत्त्वपूर्ण ठराव
घेण्यात आले. सांगली जिल्हा परिषदेने यशवंत पंचायत राज अभियानात
राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख,
शिक्षण सभापती तम्मणगौडा रविपाटील यांच्यासह जि.प. सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
सभेच्या प्रारंभी महसूल विभागाचा आढावा
घेतला गेल्यानंतर माजी जि.प. सदस्य कुंडलिक दुधाळ, महादेव पाटील, रवींद्र सावंत आदी मंडळींनी तालुक्यातील वाळू तस्करीचा प्रश्न लावून धरला. महसूल आधिकारी हे तस्करांकडून हफ्ता घेतात,याचा पुरावा देवू, अशी भूमिका मांडत आधिकारी आणि वाळू
तस्करांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली. अधिकार्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांची चौकशी
लावण्याचा ठराव झाला.
तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. जनावरांना लाळ-खुरकतसारखे रोग होत
आहेत. पशुसंवर्धन काम करीत नाही, असा आरोप
करण्यात आला. यावर गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांनी लवकरात
लवकर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन
दिले. नागज ते जत राष्ट्रीय मार्गाच्या कामावर पाण्याचा मारा
कमी होत आहे. प्रचंड धुरळ्यामुळे सहा महिन्यात 175 अपघात झाले आहेत. सहा जणांचा मृत्यू झाला आहे.याची संबंधीत ठेकेदाराकडून भरपाई घेण्यात यावी, असा ठराव
अॅड. प्रभाकर जाधव यांनी मांडला.
आमदार जगताप यांनी याची चौकशी करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या.
जत पालिकेने पाणी पुरवठ्याच्या जलवाहिनीचे इस्टीमेट दिले नाही.
त्यामुळे शहरातील महामार्गाचे काम थांबले नाही. मुख्याधिकारी अभिजीत हराळे सभेला उपस्थित नव्हते. त्यामुळे
त्यांना नोटीस काढण्याचा ठराव झाला. संख अप्पर कार्यालयाला जोडण्यात
आलेली 11 गावे जतला जोडण्याचा ठराव मुचंडीचे सरपंच अशोक पाटील
यांनी मांडला. वीज वितरणबाबत सर्वाधिक तक्रारी आल्या.
यावेळी अधिकार्यांना धारेवर धरण्यात आले.
टीसी त्वरीत दुरुस्त करावेत, वीज बिलापोटी कुठलेही
कनेक्शन तोडू नये, असाही ठराव घेण्यात आला.
जत तालुका दुष्काळ जाहीर करून त्वरीत
उपाययोजना करण्यात याव्यात, असा ठराव सर्वानुमते
मांडण्यात आला. दलित वस्तीच्या कामाचे सात कोटी रुपये तीन वर्षांपासून
पडून आहेत. अभियंता शेख यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे शिवाय
ते पंधरा वर्षे इथेच तळ ठोकून आहेत. त्यांच्या संपत्तीची चौकशी
करावी, अशी मागणी आरपीआयचे संजय कांबळे यांनी केली. यावेळी पं.स. सभापती शिवाजी शिंदे,
तहसीलदार सचिन पाटील, उपमुख्यकार्यकारी अधिकारी
दीपाली पाटील,डॉ. रवींद्र आरळी,
शिवाजी ताड,सरदार पाटील, स्नेहलता जाधव, प्रकाश जमदाडे, मनोज जगताप, अप्पासाहेब नामद, लक्ष्मण
बोराडे, नाथाजी पाटील, सुजयनाना शिंदे,
टिमू एडके, उमेश सावंत, दीप्ती
सावंत यांच्यासह विविध विभागाचे खातेप्रमुख, ग्रामसेव,
तलाठी, केंद्रप्रमुख उपस्थित होते.

No comments:
Post a Comment