जत,(प्रतिनिधी)-
माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि युवा नेते गोपीचंद
पडोळकर या दोघांनी आपापला दसरा मेळावा स्वतंत्र घेण्याचा निर्णय घेतल्यापासून धनगर
समाजात मोठी उस्तुकता ताणली गेली आहे. विषय धनगर समाजाला
आरक्षण हाच असला तरी राजकीय परिस्थितीतून दरवर्षी होणारा एकच मेळावा यंदा मात्र दोन
दोन वेगवेगळ्या स्वरुपात होत आहे.
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर आरेवाडीतील बिरोबा
देवस्थानच्या परिसरात होणार्या दोन वेगवेगळ्या मेळाव्यांबाबत
उत्सुकता ताणली गेली आहे. युवा नेते गोपीचंद पडळकर यांच्या निमंत्रणाला
प्रतिसाद गुजरातमधील पाटीदार आरक्षणाचे नेते हार्दिक पटेल सांगलीकडे रवाना झाले आहेत;
तर माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी ‘जय मल्हार’
मालिकेचा नायक देवदत्त नागे यांना निमंत्रित करुन विविध स्पर्धांच्या
माध्यमातून मेळाव्याला आकार देण्याची जोरदार तयारी केली आहे. शेंडगेंच्या नेतृत्वाखालील मेळावा एक आणि पडळकरांच्या अधिपत्याखालील मेळावा
दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे. समाज मात्र कोणाच्या मेळाव्याला
जायचे, अशा द्विधा मनःस्थितीत असल्याचे चित्र आहे. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने समाजाने सर्वदूर पोहोचेल, अशी एकजूट दाखवून पहिल्या टप्प्यात एकप्रकारची शिस्त घालून दिली होती.
कदाचित मराठा समाजाने कोणा एकाला आंदोलनाचे नेतृत्व बहाल न केल्याने
त्यांची एकजूट शक्य झाली असावी. अशी एकजूट धनगर समाजाला अद्याप
साधता आलेली नाही.
ठराविक नेतृत्वाने पुढाकार घेऊन आरक्षणाच्या विषयावर
मेळावा बोलावला असल्याने त्यात श्रेयवादाचे राजकारण आले असावे, असे दिसते. एकाच दिवशी, एकाच परिसरात
होणार्या दोन नेत्यांच्या नेतृत्वात होणार्या मेळाव्यांचा विषय मात्र एकच आहे. त्यामुळे कोणाच्या
मेळाव्याला जायचे, अशी समाजाची कोंडी झालेली आहे. परंतु यावरही समाज तोडगा काढून दोन्ही मेळाव्यांना गर्दी करून आरक्षणाच्या
बाबतीत सरकारचे लक्ष वेधण्याची शक्यता आहे. बिरोबाचे दर्शन घ्यायचे
आणि मग ठरवायचे कोणत्या मेळाव्याला जायचे, असे काहीजण म्हणत आहेत.
माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सोमवारी सांगलीत बोलताना विविध पक्षात
कार्यरत असलेल्या धनगर समाजाच्या नेत्यांना मेळाव्याला निमंत्रित करण्यात आले असल्याचे
सांगितले. मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे.
ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या मेळाव्याला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मोठी गर्दी होईल. सत्तेवर येण्यापूर्वी भाजपच्या
नेत्यांनी दिलेले आश्वासन पाळलेले नाही. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. मेळावा ही एक नांदी असून धनगर समाजाला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी
आरक्षण मिळाले पाहिजे; अन्यथा समस्त समाज हे सरकार ‘चले जाव’चा नारा देत रस्त्यावर उतरेल, असा इशाराही शेंडगे यांनी दिला.
गोपीचंद पडळकर, उत्तम जानकर
यांनीही मेळाव्याची तयारी केली आहे. पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या
मुद्द्यावरून गुजरातमध्ये वादळ निर्माण करणारे हार्दिक पटेल यांची उपस्थिती हे पडळकर
यांच्या मेळाव्यांचे मुख्य आरक्षण ठरणार आहे. पटेल हे मेळाव्याला
उपस्थित राहण्यासाठी पुण्यापर्यंत आलेले आहेत, असे सांगून पडळकर
म्हणाले, बिरोबा देवास्थान ट्रस्टने आमच्या मेळाव्याला परवानगी
दिलेली आहे. त्यामुळे मेळावा बिरोबा बनाच्या परिसरातच होत असून
तयारी पूर्ण झालेली आहे. समाज कोणत्या मुद्द्यांवर आरक्षण मागतोय,
समाजाला तो हक्क कसा आहे, आजपर्यंत सरकारने कोणती
आणि कशी आश्वासने दिली, अशा आशयाची मांडणी
हे मेळाव्यासमोर सादर केली जाणार आहे. आपण स्वतः, उत्तम जानकर आणि हार्दिक पटेल अशी मुख्य तीन मुख्य भाषणे होतील. असा आटोपशीर हा मेळा आहे. समाजाच्या आरक्षणाच्या दृष्टीने
आरेवाडीत पडळकरांच्या नेतृत्वाखाली होत असलेला दसरा मेळावा निर्णयाक ठरणार आहे.
त्यामुळे या मेळाव्याला धनगर समाजातील लहानथोर, महिला भगिनींसह सर्वांनीच उपस्थित राहावे, असे आवाहन
सांगली जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष किसन कोळेकर यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment