देवी महागौरी
दुर्गादेवीचे
आठवे रूप असून, नवरात्रात आठव्या दिवशी या देवीची पूजा करतात.
‘अन्नपूर्णा अष्टमी’ म्हणूनसुद्धा हा दिवस ओळखला
जातो. अष्टमी तिथीचे स्वामित्व देवीकडे असल्याने, या दिवशी देवीपूजनाचे विशेष माहात्म्य आहे. या अष्टमीला
‘महाअष्टमी’ म्हणतात. हिच्या
उपासनेमुळे सर्व पापांचा नाश होतो. राहू ग्रह या देवीशी निगडित
आहे. कथा - पार्वती रूपात देवीने शिवप्राप्तीसाठी
कठोर तपस्या केली. त्यामुळे ती काळीठिक्कर पडली. मग भगवान शंकरांनी गंगेच्या पवित्र जलाने तिला स्नान घातले. मग तिची काया लखलखू लागली. यामुळे तिला हिमगौरी किंवा
महागौरी म्हणू लागले. वर्णन - गौरवर्णामुळे
तिची तुलना शंख, चंद्र आणि कुंदाच्या शुभ्र फुलांशी केली जाते.
ही देवी नेहमी शुभ्र वस्त्रे धारण करत असल्याने ती श्वेतांबरधरा आहे. ही वृषभवाहना चतुर्भूजा आहे.
उजवा पुढील हात अभय देणारा. हातात त्रिशूल.
डाव्या पुढील हातात डमरू, मागील हात वरदमुद्रेत
आहे. चंडीपाठाने हिची उपासना करतात. या
दिवशी कुमारिकांचे खूप महत्त्व असते. त्यामुळे कमीत कमी नऊ मुलींना
बोलावून त्यांची पूजा करावी. या मुलींचे वय 2 ते 10 वर्षांच्या आतील असावे. त्यांना
बसायला आसन देऊन पायावर कुंकवाने स्वस्तिक काढावे. नंतर त्यांना
हळदी-कुंकू लावावे. त्यांना एकतर जेवण किंवा
खीर खाण्यास द्यावी. शिवाय काही दक्षणा आणि शक्य असल्यास एखादी
वस्तू देऊन त्यांना नमस्कार करावा. देवी भागवत पुराणानुसार कन्या
पूजेमध्ये दोन ते दहा वर्षांपर्यंतच्या कुमारिका देवीच्या स्वरूपात असतात. त्यांच्याबरोबर सुवासिनींनादेखील हळदीकुंकवाला बोलावतात व त्यांना वाण देतात.
देवी सिद्धीदात्री
दुर्गादेवीचे
नववे रूप ‘सिद्धीदात्री’ आहे. नवव्या दिवशी हिची पूजा करतात. हे दुर्गेचे स्वरूप सर्व
सिद्धी देणारे असल्या- मुळे या देवीला ‘सिद्धीदात्री’ असे म्हणतात. भगवान
शंकराने या देवीच्या कृपेनेच सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. अणिमा,महिमा, गरिमा, लहिमा, प्राप्ती, प्राकाम्य,
ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी मार्कंडेय पुराणात सांगितल्या आहेत.
वर्णन - देवी सिद्धिदात्री चार भुजाधारी आहे.
तिचे वाहन सिंह आहे. तिने हातात कमळ, शंख, चक्र व गदा धारण केले आहे. ती कमळाच्या फुलावरही विराजमान होऊ शकते. हिचे व्रत सुर
व असुर या दोघांसाठी पूजनीय आहे. देवीची पूजा केल्याने विद्या,
विजय, राजयोगाची प्राप्ती होते. देवीला नऊ वेगवेगळ्या रसांचा प्रसाद दाखवणे व फूल-फळ
दाखवणे श्रेष्ठ समजले जाते. तिच्या उपासनेने भक्ताच्या मनात इच्छा
शिल्लक राहत नाही. परमशांती व मोक्षपद मिळते. केतु या छायाग्रहाचे नियंत्रण देवी सिद्धीदात्रीकडे आहे.
आदिशक्तीच्या नऊ रूपांशी निगडित नवग्रह1) शैलपुत्री - चंद्र 2) ब्रह्मचारिणी
- मंगळ 3) चंद्रघंटा - शुक्र
4) कुष्मांडा - रवी 5) स्कंदमाता
- बुध 6) कात्यायनी - गुरू
7) कालरात्री - शनी 8) महागौरी
- राहू 9) सिद्धिदात्री - केतू


No comments:
Post a Comment