जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यातल्या निम्म्यापेक्षा
अधिक तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती ओढवली आहे. मान्सूनचा पाऊस पुरेसा न
झाल्यामुळे खरिपाच्या केवळ 83 टक्केच पेरण्या झाल्या.
त्यानंतरही पावसाचा जोर नसल्यामुळे दुष्काळी तालुक्यातील पेरण्या पूर्णत:
वाया गेल्या आहेत. आता ऑक्टोबर महिना निम्मा संपला
तरी, परतीचा मान्सून पाऊस झाला नसल्यामुळे रब्बीच्या पेरण्याही
पूर्णत: खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात केवळ
6 टक्केच रब्बीच्या पेरण्या झाल्यामुळे निम्म्या जिल्ह्यावर दुष्काळाचे
संकट आले आहे.शासनाने दुष्काळ तातडीने जाहीर करून उपाययोजना त्वरीत
सुरू करण्याची मागणी होत आहे.
सांगली जिल्ह्यात दोन लाख 75 हजार
429 हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र होते. त्यापैकी
दोन लाख 27 हजार 572 हेक्टरवर म्हणजे
83 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली होती. उर्वरित
17 टक्के क्षेत्रावर पेरणीच झाली नाही. मान्सूनपूर्व
पावसाने जत, आटपाडी, कवठेमहांकाळ,
खानापूर, तासगाव, मिरज पूर्व
तालुक्यात हजेरी लावली होती. त्यावर लगेचच शेतकर्यांनी पेरण्या केल्या. पण, त्यानंतर
पावसाने हुलकावणीच दिली. त्यामुळे फूटभर उगवून आल्यानंतर पिके
वाळून गेली आहेत.
खरीप हंगामाचे विदारक चित्र
असताना, शेतकरी परतीच्या पावसाकडे लक्ष ठेवून होता. जमिनीची मशागत
करून शेतकरी रब्बीच्या पेरणीसाठी सज्ज असताना, परतीच्या पावसानेही
पाठ फिरविल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. जिल्ह्यात रब्बीचे
दोन लाख 51 हजार 467 हेक्टर क्षेत्र असून,
त्यापैकी आतापर्यंत केवळ 15 हजार 920 हेक्टरवरच पेरणी झाली आहे. तिची टक्केवारी केवळ
6 टक्के आहे.यात जत तालुक्यात अधिक पेरण्या झाल्या
आहेत.
रब्बी हंगामातील पेरणी सर्वसाधारणपणे 1 ऑक्टोबरपासून
सुरू होते. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव,
कडेगाव, मिरज पूर्व तालुक्यातील शेतकर्यांनी रब्बी हंगामातील पेरण्यांना सुरुवातीला पेरण्या केल्या,पण पाऊस नंतर बरसलाच नसल्याने लोकांनी पेरण्यांचा नादच सोडला. परतीच्या पावसाचा पत्ताच नसल्याने रब्बी हंगामही वाया जाण्याची भीती शेतकर्यांना वाटत आहे. निम्म्या जिल्ह्यावर सध्या दुष्काळाचे
संकट निर्माण झाले आहे.
दरम्यान, निम्म्या
जिल्ह्यात मान्सून आणि परतीचा पाऊसच झाला नसल्यामुळे जत, आटपाडी,
कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर
तालुक्यातील पाझर तलाव आणि विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला आहे.
जिल्ह्यात मध्यम प्रकल्प पाच आणि लघु प्रकल्प 79 असून, यापैकी वाळवा, शिराळा आणि
मिरज तालुक्यातील दहा लघु प्रकल्पांतच 100 टक्के पाणीसाठा आहे.
उर्वरित सर्व प्रकल्पात 25 ते 35 टक्केच पाणीसाठा आहे. यामुळे जत, आटपाडी, तासगाव, खानापूर तालुक्यात
पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनास टँकर सुरु करण्याची मागणी होऊ लागली आहे.पण प्रशासन शासनाच्या आदेशाची वाट पाहात आहे. मात्र इकडे
दुष्काळी भागातील लोकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.

No comments:
Post a Comment