जत,(प्रतिनिधी)-
जत पंचायत समिती बांधकाम विभागाकडील शाखा अभियंता ए. एम. शेख यांनी दलित वस्ती सुधारणा योजना कामात अपहार केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पाच महिन्यापूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तहसिलदार कचेरीवर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले होते .परंतु प्रशासनाने शेख यांच्यावर कोणतीच कारवाई केली नाही. म्हणून येत्या बुधवारी जत बंद ठेवून पं.स. गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयास टाळे ठोकून शेख यांच्या तोंडाला काळे फासण्यात येणार आहे .अशी माहिती पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय कांबळे यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली .
याबाबत तहसीलदार व उपविभागीय अधिकारी जत यांना निवेदन देण्यात आले असून लोकशाही व सनदशीर मार्गाने शेख यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी आम्ही केली होती .परंतु प्रशासनाने आमच्या मागणीची कोणतीही गंभीर दखल घेतली नाही. वरिष्ठ अधिकारी शेख याना पाठीशी घालत आहेत .त्यामुळे दलितांवर अन्याय होत आहे. दलित निधीत अपहार करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी करून संजय कांबळे पुढे म्हणाले की ,जत शहरातून जाण्याऱ्या विजापूर ते गुहागर राज्यमार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. याचा त्रास शहरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे .या रस्त्यावरून अवजड वाहने जात असल्यामुळे धुळीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे .धुळीचा त्रास कमी व्हावा म्हणून या कामाचे ठेकेदार रस्त्यावर पाणी मारण्याचा प्रयत्न करत आहेत . परंतु नियमित पाणी मारले जात नाही. काम पूर्ण होवूपर्यत या रस्त्यावर नियमित पाणी मारण्यात यावे किंवा सदरचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे अशी मागणी संजय कांबळे यांनी यावेळी बोलताना केली .संजय पाटील , प्रशांत ऐदाळे , नारायण कामत ,सुभाष कांबळे ,आवाण्णा कांबळे , सोमनाथ कांबळे , नितीन गायकवाड आदीजण यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment