सांगली लोकसभा निवडणूक
जत,(प्रतिनिधी)-
देशभरात काही दिवसांतच लोकसभेच्या निवडणुकीची
आचारसंहिता लागण्याची शक्यता असून प्रशासनाने त्यादृष्टीने हालचालीही सुरू केल्या आहेत. मतदारयाद्या अद्ययावत करण्याचे काम अंतीम टप्प्यात आले
असून मतदान केंद्राशी संबंधित अधिकारी-कर्मचारी यांचे प्रशिक्षण
आखले जात आहेत. त्याचबरोबर दुसरीकडे विद्यमान खासदारांनी आपल्या
कामांच्या उदघाटनांचा धडाका सुरूच ठेवला आहे. असे असताना एकेकाळी
सांगली जिल्हा बालेकिल्ला राहिलेला असताना काँग्रेसमध्ये मात्र अजून अस्वस्थता दिसून
येत नाही. कारण त्यांच्यात लोकसभेचा उमेदवारच निश्चित झालेला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात शांतताच
दिसून येत आहे. सध्या काँग्रेसकडून विद्यमान खासदार संजय पाटील
यांच्या विरोधात कोण उभारणार,याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे.
सांगली
जिल्ह्यातल्या राजकारणात काँग्रेस आणि भाजप अशा दोन ताकदवान राजकीय पक्षांना सध्या
अंतर्गत संघर्षाने ग्रासले आहे. दोन्ही पक्षांची राजकीय ताकद
असताना उमेदवारीवरूनच संशयकल्लोळ सुरु आहे. काँग्रेसकडून आमदार
विश्वजित कदम, प्रतीक पाटील, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील यांची नावे चर्चेत आहेत.
विश्वजीत कदम यांनी यातून अगोदरच माघार घेतली
आहे.पण पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी दिल्यास आपण कामाला लागू,
असे ते सांगताना दिसत आहेत. सध्या सर्वांनीच जोरदार
फिल्डिंग लावली आहे. नेहमीप्रमाणे सांगली लोकसभेचा उमेदवार हा
दिल्लीतून ठरणार असल्याने तुर्तास काँग्रेसच्या गोठात शांतता आहे. खासदार संजय पाटील यांना चांगली लढत कोण देऊ शकतो, याचीच
चर्चा सध्या होताना दिसत आहे.
भारतीय
जनता पक्षाचे नेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतच सांगली लोकसभेसाठी संजय
पाटील हेच उमेदवार असतील, अशी घोषणा केलेली असताना याघडीला पक्षांतर्गत
राजकीय संघर्ष टोकाचा सुरू असल्याने खासदार पाटील यांच्या उमेदवारीवरूनच संभ्रमावस्था
निर्माण केली जात आहे. आज केंद्रात सक्षम भाजप सरकार असताना सांगली
लोकसभा मतदारसंघात ताकद असताना खासदार पाटील यांची अवस्था महाभारतातील अभिमन्यूसारखी
का व्हावी, हे राजकीय गणित अजून सुटलेले नाही. पक्ष म्हणून पक्षाचे नेते प्रचार करतील; पण...
इथेच कुरघोड्यांची चर्चा सुरू होते आहे. सांगली
लोकसभा मतदारसंघातील आघाडीची जागा काँग्रेसकडे असून, युती झाली
असली, तरी ही जागा भाजपकडे आली आहे. त्यामुळे
आघाडीतील राष्टवादी आणि युतीमधील शिवसेना हे पक्ष सध्या तरी मित्रपक्षांच्या भूमिकेत
आहेत. त्यामुळे त्यांना यासाठी फार मेहनत घ्यावी लागणार नाही.
काँग्रेस व भाजपच्या राज्यातील नेत्यांनी सांगली लोकसभेसंदर्भात मुंबईत
बैठका घेऊन तयारीला लागण्याचे आदेशही दिले आहेत. मात्र आदेशाप्रमाणे
हालचाली होण्याऐवजी पक्षांतर्गत कुरघोड्या वाढल्या आहेत. माजी
केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील आणि पक्षाचे शहर-जिल्हाध्यक्ष
पृथ्वीराज पाटील हे दोनच इच्छुक उमेदवार उमेदवारीसाठी धडपडत असताना दुसरीकडे पक्षाच्या
प्रदेश कार्यकारिणीतील सदस्यांकडून आमदार विश्वजित कदम,
वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्याकडेही उमेदवारीबद्दल
विचारणा केली जात आहे. गटबाजीत विभागलेल्या काँग्रेससमोर उमेदवारीचा
पेचप्रसंग उभा राहिला आहे. काँग्रेसमधील गटबाजी पाहून राष्ट्रवादीचे
अरुण लाड यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी मागे लागले आहेत. काँग्रेसकडून कोणालाही उमेदवारी दिली, तरी पक्षांतर्गत
गटबाजीचा फटका बसण्याची चिंता वरिष्ठ नेत्यांना वाटत असल्याने ते याबाबत सावधगिरीच्या
भूमिकेत आहेत. उमेदवारी निश्चित नसताना
निवडणुकीची तयारी करायची तरी कशी, असा सवाल कार्यकर्ते उपस्थित
करीत आहेत.
भाजपमध्ये खासदार संजय पाटील यांची दावेदारी सर्वांत
मजबूत मानली जात असल्याने त्यांच्यात उमेदवारीवरून कोणताही गोंधळ नाही. मात्र गटबाजीने पक्ष त्रस्त आहे. खासदार-आमदारांमधील हा वाद पक्षासाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतरही पक्षाचे कार्यकर्ते अद्याप शांतच
दिसत आहेत. सध्या खासदार संजय पाटील एकटेच फिरत असल्याचे दिसत
आहे. अर्थात खासदार पाटील यांची उमेदवारी निश्चित असली तरी पक्षांतर्गत कुरघोड्या खासदारांना त्रासदायक ठरण्याची शक्यता
आहे. खासदार पाटील यांचे सध्याचे कट्टर विरोधक गोपीचंद पडोळकर
यांची भूमिकाही सध्या महत्त्वाची मानली जात आहे. भाजपमधूनच त्यांना
पाठबख मिळत असल्याने त्यांनीही जिल्ह्यात खासदार पाटील यांच्या विरोधात रान उठवयाला
सुरुवात केली आहे. मात्र उमेदवार निश्चित
झाल्यावरच खरे चित्र काय असणार आहे, याचा अंदाज बांधता येणार
आहे.
No comments:
Post a Comment