Thursday, February 28, 2019

पुण्यात शिक्षक संघाची शनिवारी शिक्षण परिषद, मेळावा


जत,(प्रतिनिधी)-
 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची शिक्षण परिषद व शिक्षक मेळावा 2 मार्चला पालखी मैदान सासवड, पुणे येथे होत असून या शिक्षण परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, नगरविकास राज्य मंत्री रणजित पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे हे उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील तीन हजारांहून अधिक प्राथमिक शिक्षक या शिक्षण परिषदेत सहभागी होणार असून शासनाने यासाठी 28 ते 2 मार्च दरम्यान तीन दिवसांची सुट्टी शिक्षकांना दिली आहे. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांनी ही माहिती पत्रकार बैठकीत दिली.

शिंदे यांनी सांगितले, ही राज्यातील प्राथमिक शिक्षकांची वैभवशाली परंपरा असलेली, शिक्षकांच्या प्रश्नांसाठी अविरतपणे प्रयत्न करणारी एकमेव बलाढ्य संघटना आहे. आतापर्यंत शिक्षकांचे व शिक्षणाचे विविध प्रश्न शिक्षक संघाच्या व्यासपीठावरूनच सोडवणूक करून घेतले आहेत. शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली भव्य शिक्षक परिषदेचे आयोजन करण्यात आहे. या शिक्षक मेळाव्यात मुख्यमंत्री व मंत्रिमहोदय यांच्यासमोर पुढील मागण्या मांडण्यात येणार आहेत. नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरणात आवश्यक ते बदल करून सर्वसमावेश धोरण तयार करण्यात यावे, चालू वर्षी बदली प्रक्रियेत अन्याय झालेल्या शिक्षकांना तात्काळ सोयीच्या ठिकाणी बदली द्या, सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून सातवा वेतन आयोग त्वरित लागू करावा, नगरपालिका व महापालिकेतील शिक्षकांना वेतनासाठी 100 टक्के अनुदान देण्यात यावे, केंद्रप्रमुखांची पदे 50 टक्के शिक्षकांतून व 50 टक्के परीक्षा घेऊन भरण्यात यावी, कमी पटसंख्येअभावी शाळा बंद करण्यात येऊ नये, यासह एकूण 22 मागण्यांसाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सर्व मागण्या मान्य करून घेण्यासाठी राज्यातील प्राथमिक शिक्षकांनी शिक्षण परिषद व शिक्षक मेळाव्यास लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. यावेळी श्री. शिंदे यांच्यासह जिल्हा सरचिटणीस अविनाश गुरव, राज्य उपाध्यक्ष हंबीरराव पवार, पुणे विभाग अध्यक्ष तानाजी खोत, शिक्षक बँक संचालक सुधाकर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन कदम, पासगोंड पाटील, अरुण पाटील, पोपट सूर्यवंशी, कार्याध्यक्ष दगडू येवले, खजिनदार खाजासो शेख उपस्थित होते.
शिक्षण, विद्यार्थी यालाच आधी प्राधान्य शिक्षक संघाचा शिक्षण परिसंवाद व मेळावा हा कार्यक्रम 28 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मात्र त्यादिवशी असणार्या जिल्हा परिषद आयोजित डॉ. कदम शिष्यवृत्ती परिक्षा प्रक्रीया पूर्ण करूनच सर्व शिक्षक मेळाव्यास जाणार आहेत. सुट्टीचा कालावधीही भरून काढण्यात येणार आहे. शासनाने तीन दिवस सुट्टी जाहीर केली असून तसे आदेशही देण्यात आले आहेत, अशी माहिती श्री. शिंदे यांनी दिली.

No comments:

Post a Comment