जत,(प्रतिनिधी)-
माझीया प्रेमाशी समरस हो प्रिये,
तू माझी व मी तुझा आहे..
येऊ दे संकटे आली कितीही,
भावनांचा बांध फुटायचा अजून बाकी आहे..
प्रेम..अडीच अक्षरी शब्द. 'व्हॅलेंटाईन डे'ला तरुणाईचा उत्साह गगनात मावेनासा असाच राहील. पण, खरंच प्रेम व्यक्त करण्यास 'दिवसा'चे निमित्त लागते? 'एक' दिवसाचं प्रेम किती दिवस टिकतं? वर्षभर मनात राखून, दडवून ठेवलेल्या प्रेमाला व्यक्त करण्यास 'मुहूर्त' का लागावा? खरंतर, वर्षभरातील ३६५ दिवस प्रेम फुलतं व बहरतं. तरीही नेमका 'हाच दिवस' का उजाडावा? हे अजूनही न उलगडलेले कोडेच आहे.
मागील १0-१२ वर्षांपासून प्रेमाचा मोठा 'बाजार' मांडला जात आहे. प्रेम ही दैवी देणगी. प्रेमाशिवाय जगण्याला अर्थ नाहीच. त्यामुळे प्रेम करावे धुंदीत, मस्तीत, बिनधास्त, आसमंताला गवसणी घालणारे, मनासारखं आणि मनाप्रमाणे.. आपल्या भारतीय संस्कृतीला जगाने 'मान्यता' दिलेली असताना आजचे तरुण मात्र डोळ्यांवर पट्टी बांधून पाश्चात्यांच्या संस्कृतीचे अंधानुकरण करताना दिसून येत आहेत. काही वर्षांपासून भारतात 'व्हॅलेंटाईन डे' एखाद्या सणाप्रमाणेच जल्लोषात साजरा केला जात आहे. 'चांगलं कमी आणि वाईट जास्त' घेण्याच्या वृत्तीने पाश्चात्त्य संस्कृतीशी आजची तरुणाई समरस होत आहे. 'व्हॅलेंटाईन डे'ला प्रेमाचा अक्षरश: 'बाजार' मांडला जात आहे. याच 'बाजारा'चा फायदा घेऊन पाच रुपयांपासून ते १00 रुपयांपयर्ंत गुलाब विकला जातो. शुभेच्छापत्रही खिशाला न परवडणार्या किमतीत आहेत. वर्षभर मनात ओसंडून वाहणारे प्रेम 'व्हॅलेंटाईन डे'ला व्यक्त करून समोरच्याकडून 'होकारा'ची अपेक्षा ठेवणे आणि 'नकार' मिळताच त्याच व्यक्तीचा तिरस्कार करणे याला खरंच प्रेम म्हणायचे? चेहर्यावर, बाह्यांगावर आकर्षित होऊन शरीर आणि स्वत:च्या सुखासाठी आज 'प्रेमा'चा आधार घेतला जात आहे. एखाद्या मुलीला किंवा मुलीने मुलाला 'प्रपोज' केल्यानंतर समोरच्याकडून नकार मिळताच 'तू नहीं तो और सही' म्हणत दोघेही दुसरे सावज पकडण्यासाठी 'एक पाऊल पुढे' टाकतात, ही वस्तुस्थिती आहे. आज मुलीही मागे राहिलेल्या नाहीत. 'एन्जॉय' करण्यासाठी मुली होकार देतात. काही दिवसानंतर 'मन' भरले की मुलाला सोडून देतात. आज प्रेम म्हणजे निव्वळ 'टाईमपास' झाल्याचे चित्र आहे. शहरात आणि आता ग्रामीण रस्त्यांवरही प्रेमाच्या नावाखाली 'बाईक'वरून सर्रास हिडीस आणि ईल हातवारे करून खर्या प्रेमाला 'बदनाम' करण्याची एकही संधी आजचे प्रेमीयुगल सोडताना दिसत नाहीत. पूर्वी कबुतराला प्रेमाचे प्रतिक मानले जात असे.
आता विज्ञानामुळे कबुतराची जागा 'मोबाईल'ने घेतली आहे. केवळ मोबाईलच नव्हे तर 'ई-मेल', फेसबुक, गुगल, ट्विटर, व्हॉट्स अँप आदी 'सोशल मीडिया'मुळे जग खूप 'जवळ' आले आहे. प्रत्येकाच्याच हाती आता 'स्मार्ट फोन' दिसतो. शाळकरी मुले, मुलीसुद्धा यातून सुटल्या नाहीत. कॉलेज, महाविद्यालयांप्रमाणे आता शाळा, हायस्कूलमध्येही 'प्रेमा'चा उदय झाला आहे. मिसरूढ न फुटलेले विद्यार्थी बाईकवर मुलींना मागे बसवून स्वत:ला 'सलमान खान'चा 'अवतार' समजतात. अभ्यासाऐवजी 'प्रेमाचे धडे' गिरवतात. तासन्तास, दिवसा आणि रात्रीही प्रेमीयुगलांसह विद्याथीर्ही 'मोबाईल'वर 'चॅटिंग' करतात. नंतर मात्र परीक्षेत 'बारा' वाजणार हे ठरलेलेच. पूर्वी फक्त 'डे' साजरा व्हायचा. आता तर 'व्हॅलेंटाईन वीक' साजरा केला जातो. प्रेमभंगानंतर आत्महत्यांसारखे प्रकार उघडकीस येतात. पण, ज्या आई-वडिलांनी जन्म देऊन, जीवापाड प्रेम करून लहानाचे मोठे केले, त्यांचा विचार 'आंधळे' प्रेमवीर 'डोळसपणे' करीत नाहीत. माणसाला जन्मापासून ते मृत्यूपयर्ंत प्रेम हवं असतं. त्यामुळे प्रेमाचा एक दिवस बाजार मांडण्यापेक्षा वर्षातील प्रत्येक दिवशीच नि:स्वार्थ प्रेम करून एकमेकांच्या भावनांचा आदर राखल्यास प्रेम चिरकाल टिकेल, हे सांगण्यास कुण्या ज्योतिष्याची गरज नाही.
No comments:
Post a Comment