Tuesday, February 19, 2019

जत तालुका क्रीडा संकुलाची दुरवस्था

मार्गदर्शक,देखरेखीचा अभाव;क्रीडा क्षेत्रात प्रचंड संताप
जत,(प्रतिनिधी)-
जतच्या सांगली मार्गावर उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाची प्रचंड दुरवस्था झाली असून याठिकाणी देखरेखीला रखवालदार तर नाहीच,पण मार्गदर्शकाची पदेही भरली नसल्याने मैदानी खेळात आघाडी घेतलेल्या जतच्या युवकांना यशापासून दूर व्हावे लागत आहे. विशेष म्हणजे तालुका क्रीडाधिकारीपासून ते राज्याच्या क्रीडा उपसंचालकापर्यंतच्या पदावर चक्क जतचीच माणसे विराजमान आहेत, पण या लोकांना आपल्या तालुक्याकडे आणि इथल्या युवकांच्या भवितव्याकडे पाहायला वेळ नाही. त्यामुळे जत तालुक्यातल्या क्रीडा क्षेत्रात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

जत तालुक्याला क्रीडा क्षेत्रातील यशाची मोठी परंपरा आहे. खोखो, कबड्डी, हॉकी,फुटबॉल या सांघिक खेळात अगदी राष्ट्रीय स्तरावर मजल मारून आपला दबदबा कायम ठेवला होता. मैदानी खेळात तर जतशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती होती. आजही अनेक खेळाडू आपले नाव कमावत आहेत, मात्र त्यांना शासकीय स्तरावर कोणतेच सहकार्य मिळत नाही. शाळा आणि पालकांच्या मदतीवरच खेळाडू पुढे जात असले तरी त्याला मर्यादा पडत आहेत. कारण त्यांना शासनाची साथ मिळत नाही. जत येथे सांगली मार्गावर तालुका क्रीडा संकुल बांधण्यात आले आहे, मात्र या ठिकाणी मार्गदर्शकाची नियुक्ती करण्यात आली नसल्याने खेळाडूंना त्याचा काहीच फायदा होताना दिसत नाही. याशिवाय संकुलाची देखरेख करायला देखील रखवालदार नियुक्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे या क्रीडा संकुलाची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली आहे. हे मैदान तयार करायला प्रचंड पैसा खर्ची टाकण्यात आला असला तरी आज तो पैसा मातीत गेला आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
या मैदानात दुचाकी वाहने आणून मैदानाची नासधूस केली जात आहे. या मैदानाचा वापर दारू च्या बाटल्या फोडण्यासाठी आणि अन्य अनैतिक मार्गासाठी केला जात आहे. वास्तविक ज्या खेळाडूंसाठी या क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आली आहे,त्या खेळाडूंना मात्र त्याचा काही एक उपयोग होताना दिसत नाही. याचा वापर दुसरेच लोक दुसऱ्याच कारणांसाठी करत आहेत. त्यामुळे या  क्रीडा संकुलाची 'असून अडचण आणि नसून खोळंबा' अशा प्रकारची झाली आहे. 
विशेष म्हणजे जतच्या मातीतील अनेक खेळाडू आज याच खेळाच्या जोरावर  विविध क्षेत्रात नाव कमावून आहेत. त्याच बरोबर जत तालुका क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी आणि राज्याचा उप संचालक या पदावर जतचीच माणसे विराजमान आहेत. मात्र या च माणसांना जतची क्रीडा क्षेत्राची परंपरा पुढे चालू राहावी, अशी इच्छाच दिसत नाही. या क्रीडा संकुलासाठी मार्गदर्शक नाही,रखवालदार नाही. त्यामुळे या क्रीडा संकुलाचा काहीच उपयोग येथील खेळाडूंना होत नाही. त्यामुळे जत तालुक्यातल्या क्रीडा क्षेत्रात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
जत तालुका क्रीडा संकुलाच्या जागा त्वरित भरण्यात याव्यात अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment