जत शहरातील चाटी गल्ली येथील बंद घराचे कुलूप कटावनीने तोडून अज्ञात चोरट्यानी सुमारे एक लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.त्यामध्ये रोख ६० हजार रुपये व सोने आणि चांदीच्या दागिन्याचा समावेश आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली . याप्रकरणी मल्लीकार्जून सीदलींगप्पा सोलापूर यांनी जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे . चोरीच्या या घटनेमुळे जत शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत .पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की , तत्कालीन जत ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दिलीप सोलापुरे यांचे वडील सीदलिंगाप्पा सोलापुरे हे आजारी असल्यामुळे उपचारासाठी त्यांना सांगली येथे दाखल करण्यात आले आहे . त्यामुळे दिलीप सोलापुरे हे त्यांच्यासोबत सांगली येथे आहेत. दिलीप यांची पत्नी व दोन मुले घरात होती रात्री जेवण झाल्यानंतर दिलीप यांची पत्नी व दोन मुले मुख्य घराला कुलूप लावून शेजारच्या खोलीत झोपली होती. अज्ञात चोरट्यानी बुधवारी रात्री ११ ते १ वाजण्याच्या दरम्यान बंद घराचे कुलूप तोडून घरातील पत्र्याच्या पेटीत असलेले सुमारे दोन किलो चांदीचे दागिने त्यामध्ये समई, फुलदानी, भांडी ,तांब्या ,वाटी ,चमचा , आरत्या इत्यादी ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल व २८ हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या आणि लोखंडी कपाटातील रोख साठ हजार रुपये कटावनीने कुलूप तोडून लंपास केले आहे . मुख्य घरातील चोरट्यांचा आवाज शेजारच्या खोलीत येऊ लागल्यामुळे दिलीप यांच्या पत्नी जाग्या झाल्या होत्या. परंतु चोरट्यांनी तेथील सर्वच घरांना बाहेरून कडी लावली होती .त्यामुळे त्यांना बाहेर येता आले नाही .सदरची घटना त्यांनी मोबाईल फोनद्वारे दिलीप सोलापूर यांना सांगितली त्यानंतर दिलीप सोलापूर यांनी या घटनेची माहिती जत पोलिसांना दिल्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले .परंतु तोपर्यंत चोरट्यानी पलायन केले होते .पोलिस घटनास्थळी आल्यानंतर लगेच चोरीला गेलेल्या मालमत्तेची बिले व पावत्या आहेत काय ? याची चौकशी करण्यात व्यस्त झाले परंतु अज्ञात चोरटे चोरी करून गेल्यानंतर त्यांचा पाठलाग अथवा इतर चौकशी त्यांनी केली नाही . त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे . दिलीप सोलापुरे परगावी असल्यामुळे त्यांचा भाऊ मल्लीकार्जून सोलापुरे यानी यासंदर्भात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार एस.बी.साळुंखे करत आहेत.
No comments:
Post a Comment