Friday, February 22, 2019

आई -वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत-सौ राणी पाटील

तासगाव (प्रतिनिधी)-
आई -वडिलांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टाचा चीज लक्षात घेऊन तरुणांनी त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन सौ. राणी पाटील यांनी तासगाव येथील पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रसंगी बोलताना केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जम्मू काश्मीर येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार होते.

       याप्रसंगी बोलताना सौ. पाटील पुढे म्हणाल्या, युवकांनी भारताचे चांगले नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करावेत. आई-वडिलांबरोबरच गुरुजनांचा सन्मान राखावा . घराचं घरपण टिकवण्यासाठी मोबाईल पासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. आई-वडील व घरातील सर्वांचा आदर करा व त्यांची मान खाली जाईल असे वर्तन करू नका हे सांगतानाच शेतकरी बापाला खऱ्या आयुष्यात पास करण्याची जबाबदारी युवकांनी घेतली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी गुणवंत प्राध्यापक व गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले .
        यावेळी  प्रा.आण्णासाहेब बागल यांनी संकलित केलेल्या वर्तमानपत्रातील बातम्यांचा संग्रह असलेल्या 'वसंत वृतवेध ' या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते झाले. वरिष्ठ विभागाचे कार्याध्यक्ष प्रा. एम.डी.पाटील , कनिष्ठ विभागाचे कार्याध्यक्ष प्रा. आर. डब्ल्यू. रोमन, वरिष्ठ जिमखाना विभाग प्रमुख प्रा.ए.के.पाटील ,कनिष्ठ जिमखाना विभाग प्रमुख प्रा.आर. व्ही .पाटील यांनी आपआपल्या विभागाचे अहवाल वाचन केले.
        अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. आर. आर.कुंभार म्हणाले नॅक मध्ये ' ए ' ग्रेड मिळवण्याचे ध्येय ठेवून कामकाजाची वाटचाल सुरू आहे. यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या कामकाजाचा धावता आढावा  घेतला . शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाविद्यालयात राबविलेल्या विविध उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला .महाविद्यालयातील प्रगतीमध्ये विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी 'लोकशाही ' ही विचार करायला लावणारी नाटिका सादर केली.
           कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. अलका इनामदार -पाटील यांनी केले. आभार प्रा.  डॉ. डी. बी. थोरबोले यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. तातोबा बदामे व प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील गुरुदेव कार्यकर्ते ,विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता प्रा.डॉ. योगेश आदोंजी यांनी सुमधूर आवाजात गायिलेल्या पसायदानाने झाली .

No comments:

Post a Comment