Tuesday, February 26, 2019

शुद्ध पाण्याच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

जत,(प्रतिनिधी)-
जत शहर आणि परिसरात गेल्या काही वर्षांपासून अनेकांनी शुद्ध पाण्याच्या नावाखाली पाण्याचा व्यवसायच थाटला आहे. पांढरे शुभ्र, पारदर्शक, चकचकीत व थंड पाणी घरपोच, कार्यक्रमस्थळी पोहोचविण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. जारचे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे न पाहता दुकानदारही पाणी सर्रास वापरत आहे. हल्ली जारचे पाणी वापरण्याची शहरात फॅशन झाली आहे.
शहरासह ग्रामीण भागात हॉटेल, पान टपरी, छोटेमोठे व्यावसायिक दुकानदार, इतकेच काय अनेक घराघरातून जारचे पाणी वापरले जाते. मात्र, हे पाणी खरंच पिण्यास योग्य आहे का? याची कोणतीच खातरजमा केली जात नाही. आज-काल लग्न समारंभ, छोट्या-मोठय़ा कार्यक्रमातून तसेच अनेकांच्या घरीही पिण्यासाठी जारचेच पाणी वापरले जाते. थंडगार जारची ३0 रुपये प्रमाणे विक्री होते. दुष्काळी भागात पाणीटंचाई असल्याने या पाण्याला मोठी मागणी आहे. यामुळे दुष्काळी पट्टय़ात अनेक ठिकाणी शुद्ध पाणी विक्री व्यवसाय सुरू आहेत.
अनेकांची नोंदणी नाही
या व्यवसायात अन्य व्यवसायांपेक्षा मोठी मिळकत असल्याने याकडे वळणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एका बाटली बंद पाण्यासाठी 10 ते २0 रुपये मोजावे लागतात तर २0 लिटरचा थंड पाण्याचा एक जार ग्रामीण भागात २५ ते ३0 रुपयांत विकला जातो. साधारण १ लिटर पाण्यासाठी एक ते सव्वा रुपया खर्च पडतो. त्यामुळे शुद्ध पाणी म्हणून ग्राहक सहजपणे ते घेतात. अनेक छोट्या मोठय़ा गावातून थंडगार जारचे पाणी रोजच्या रोज घरपोच केले जाते. थंडगार जारच्या पाण्याचा व्यवसाय सध्या फोफावत चालला असून, दुष्काळी तालुक्यात ४0 पेक्षाही जास्त ठिकाणी जारचे थंड पाणी केंद्रे सुरू असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहेत. यातील अनेक केंद्रांनी शासनाकडे नोंदणीही केली नसल्याचे समजते. परिणामी तथाकथित थंड पाण्याच्या जारमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आत्ताच उन्हाळा जाणवू लागल्याने जारच्या थंड पाण्याची विक्री अधिकच वाढणार आहे. तेव्हा अनधिकृतपणे थाटलेल्या शुद्ध पाणी विक्री केंद्रांची माहिती प्रशासनाने घेऊन त्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. प्रशासनाने अधिकृत पाणी विक्री केंद्रांची यादीही प्रसिद्ध करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

No comments:

Post a Comment